आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान, राजकीय वादाला सुरुवात

उत्तर प्रदेशातील अमेठीत भाजप नेते आणि जगदीशपूरचे आमदार सुरेश पासी यांनी आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या २० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये सुरेश पासी म्हणाले की, मी कधीही मशिदीत जात नाही, पूर्वी कधीच गेलो नाही आणि भविष्यातही जाणार नाही. मी मते मागण्यासाठी जात नाही आणि त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत नाही. आम्हाला मुस्लिमांचा मतांची गरज नाही. त्यांच्या वक्तव्यामुळेनवा वाद सुरू झाला आहे.

भाजप आमदाराने असेही म्हटले की, आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही. त्यांच्या या वक्तव्याने वादाला सुरुवात होताच भाजपने या विधानापासून फारकत घेत ते सुरेश पासी यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले. विरोधी पक्षांनी या टिप्पणीवर जोरदार टीका केली आहे. मात्र, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधांशू शुक्ला म्हणाले की, या टिप्पण्यांचा भाजपच्या विचारसरणीशी काहीही संबंध नाही. शुक्ला म्हणाले, भाजप ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ वर विश्वास ठेवतो. ही पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. सुरेश पासी यांनी जे म्हटले ते त्यांचे वैयक्तिक मत आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी हे विधान राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे. सिंघल यांनी आरोप केला की, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजप नेते अशी विधाने करतात. ते मते मिळविण्यासाठी भावाला भावाविरुद्ध, एका धर्माला दुसऱ्या धर्माविरुद्ध आणि एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व नाटक आहे. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम उदित यादव यांनी दावा केला की, समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने ही टिप्पणी करण्यात आली आहे. हिंदू-मुस्लिम फूट पाडणे हे भाजपचे राजकारण आहे. भाजप मतांसाठी कोणत्याही थराला जाईल, असा आरोपही त्यांनी केला आहे.