
कबड्डीत चपळाई, घट्ट पकड, डाव टाकणे आणि डाव परतवणे असे गुण लागतात. राजकारणातही असेच गुण लागतात. राजकारणात आम्ही वेगळ्या प्रकारची ‘कबड्डी’च खेळतो, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. एकेकाळी मातीच्या मैदानात दिग्गज कबड्डीपटूंनी मैदान गाजवलेले असताना आता मॅटवर कबड्डी खेळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मॅटवर खेळणे अयोग्य नाही. मॅटवर खेळा, पण माती आणि मातेला विसरू नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डिलाईल रोड येथील ऐतिहासिक श्रमिक जिमखाना येथे आयोजित कार्यक्रमात दिग्गज कबड्डीपटूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी मैदान गाजवणाऱ्या कबड्डीपटूंचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. कबड्डीत मैदान मारणाऱ्या दिग्गजांना भेटता आल्याबद्दल त्यांनी आयोजक आमदार सुनील शिंदे यांचे कौतुकही केले. मैदानाचा वाढदिवस साजरा करण्याचा हा अनोखा उपक्रम असल्याचे ते म्हणाले. तसे पाहिले तर कबड्डीतील दिग्गज हे जमिनीतून उगवलेले तारेच आहेत. त्या ताऱ्यांसोबत मी, आदित्य तुमच्या सर्वांसोबत असल्याचा हा आनंदाचा क्षण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. शिवसेना आणि कबड्डीचे नाते वेगळे आहे. आजही दत्ताजी नलावडे, मधुकरराव सरपोतदार यांची आठवण येते.
मॅटसाठी वास्तू उभारून देणार
श्रमिक जिमखाना हीरक महोत्सवी सोहळ्याच्या माहिती पुस्तकातून या ठिकाणी मॅटसाठी वास्तू उभारण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर ‘दिले’ असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
…आणि राम मंदिर उभे राहिले
मी सीएम होण्याआधी शिवनेरीच्या शिवजन्मभूमीवरील मातीचा कलश रामजन्मभूमीत जाऊन पुजाऱ्यांच्या हातात दिला. यानंतर कित्येक वर्षे रखडलेल्या केसचा निकाल लागला आणि तिथे राम मंदिर उभे राहिले. त्यामुळे आपल्या मातीचे महत्त्व खूप मोठे असल्याचे ते म्हणाले.
























































