हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी जंगल, जमीन हक्कांवर डल्ला मारू देणार नाही; टोरंटोविरोधात शिवसेना आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोरंटो पॉवर लिमिटेड कंपनी कर्जत तालुक्यात तीन हजार मेगावॅट क्षमतेचा हायड्रो पॉवर प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी बळजबरीने भूमिपुत्र आदिवासी तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचे कारस्थान आखण्यात आले असून त्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. याद राखा… कोणत्याही परिस्थितीत स्थानिकांना बेघर होऊ देणार नाही. आदिवासी व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

कर्जत तालुक्यात असलेल्या कडाव गावाजवळील पाली येथे टोरंटो कंपनीच्या वतीने २७ हजार कोटी रुपयांचा भव्य हायड्रो पॉवर प्रकल्प उभारणार असून त्यासाठी कंपनीच्या वतीने जमीन ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कोणत्याही नोटिसा किंवा पूर्वकल्पना न देता आदिवासी व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने स्थानिकांनी ठाम विरोध केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रकल्पबाधितांना एकत्र केले असून त्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली.

तर रस्त्यावरची लढाई लढणार
भूमिपुत्रांच्या जंगल तसेच जमिनीच्या हक्कांवर कुणालाही गदा आणू देणार नाही. हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेण्याचे प्रकार बंद करावेत अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, जिल्हा परिषद सदस्य मारूती तथा बाबू घारे यांनी बैठकीत दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगदीश ठाकरे लहू श्रीखंडे, चेतन पवाळी, सुनील मसणे, चंदू हगवणे, सुरेश मसणे, पप्पू देशमुख यांच्यास आंबोट, पोटल, पाली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.