‘मिंधे’ गटाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यालयात ‘घुसखोरी’ करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मनमानीपणे सर्वच पक्षांची कार्यालये सील केली आहेत. मात्र आता सर्वच पक्षांनी सील कार्यालयाबाहेरच जनतेच्या प्रश्नांसाठी उपस्थित राहण्यास सुरुवात केली आहे. कार्यालये बंद झाली असली तरी लोकप्रतिनिधींनी आयुक्तांच्या मनमानीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या आठवडय़ात ‘मिंधे’ गटाने शिवसेनेच्या कार्यालयात ‘घुसखोरी’ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेकडून मिळालेल्या चोख प्रत्युत्तरानंतर ‘मिंधे’ गटाने या ठिकाणाहून काढता पाय घेतला. यानंतर पालिका आयुक्तांनी सर्वच पक्षांची कार्यालये सील केली. यानंतर आयुक्तांच्या मनमानीचा निषेध करीत शिवसेनेने जोरदार निषेध करीत आंदोलन करून पक्ष कार्यालय सुरू करण्याची मागणी केली, मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तरीदेखील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक-लोकप्रतिनिधींनी पक्ष कार्यालयाजवळ येण्यास सुरुवात केली असल्याचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी सांगितले. दरम्यान, आज काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीदेखील आज उपस्थित राहून कामकाज केले. राष्ट्रवादीच्या राखी जाधवदेखील जनतेच्या प्रश्नांसाठी पक्ष कार्यालयाजवळ उपस्थित होत्या. दरम्यान, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह सर्वच पक्षांकडून पक्ष कार्यालय सुरू करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































