Weather Update – पुढील तीन दिवस राज्यात कोसळधार! चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका बसणार

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून याचे मोंथा चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे मोंथा वादळ आज आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असून महाराष्ट्रालाही याचा फटका बसणार आहे. यामुळे मुंबई, पालघर, ठाणेसह विदर्भात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेले तीन-चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत.