वेब न्यूज – ब्रेन चिपला वेलकम आणि हेडफोन्सला टाटा

1966

>> स्पायडरमॅन

जगभरच्या तरुणाईत प्रचंड लोकप्रिय असलेला, तंत्रज्ञानाच्या जगाला एक वेगळेच वळण देणारा आणि टेस्ला, स्पेस एक्ससारख्या जबरदस्त कंपन्यांचा संस्थापक असलेला एलोन मस्क हा एक अवलियाच आहे. तंत्रज्ञान मग ते रोबोटिक असो, अवकाश तंत्रज्ञान असो किंवा अजून काही… सतत काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास या माणसाने घेतलेला आहे. या एलोन मस्कने स्थापन केलेल्या न्यूरालिंक स्टार्टअपने काही काळापूर्वीच मानवी केसाहून दहापट पातळ असा लवचीक धागा तयार करून सगळय़ांनाच आश्चर्यचकित केले होते. आता हे न्यूरालिंक स्टार्टअप मानवी मेंदूत बसवता येईल अशी एक ’ब्रेन चिप’ घेऊन येते आहे. या विशेष ब्रेन चिपला मानवी मेंदूत रोपण केले की त्याला संगीताचा आनंद घेता येणार आहे, परत जोडीला या संगीताला स्ट्रिम करण्याचा अर्थात म्युझिक स्ट्रिमिंगचा आनंददेखील घेता येणार आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे आता या चिपमुळे हेडफोन्ससारखे तंत्रज्ञान अडगळीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फक्त संगीताच्या आनंदासाठीच नाही, तर मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठीदेखील या ब्रेन चिपचा अत्यंत चांगला उपयोग होऊ शकतो असा एलोन मस्क यांनी दावा केला आहे. ही चिप डिप्रेशन, अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या आजारांनी ग्रस्त लोकांसाठी वापरली जाऊ शकते. तसेच मणक्याच्या हाडाची दुखापत लवकर भरण्यासाठीदेखील या तंत्रज्ञानाचा उपयोग करता येणार आहे. या ब्रेन चिपच्या जोडीने कॉम्प्युटर इंटरफेस तंत्रज्ञानाचा वापर करता येणे शक्य असल्याने, मानवी मनाच्या आणि मेंदूच्या अनेक विकारांचा अभ्यास करणे खूपच सुलभ होणार आहे. उंदीर आणि माकडांवरती सफलतापूर्वक या चिपचे प्रयोग करून झाल्यानंतर आता मानवावरील प्रयोगाचा अंतिम टप्पा सुरू असल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात या चिपला जगासमोर आणले जाण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या