वेब न्यूज – ग्लोबल वेब इंडेक्स

सोशल मीडिया अर्थात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप, यूटय़ूब इत्यादी आता लोकांच्या जीवनाचे एक अभिन्न अंग बनलेले आहेत. मनोरंजनाबरोबरच अभ्यास, विविध कला शिकणे, स्वतःला व्यक्त करणे, ऑनलाइन व्यवसाय अशा अनेक कामांसाठी सोशल मीडियाचा सर्रास वापर होऊ लागला आहे. इंटरनेटने जगाला जणू एकत्र बांधूनच घातले आहे. जगभरातील विविध देशांतील इंटरनेट वापरकर्ते किती प्रमाणात इंटरनेटवर वेळ घालवतात यासंदर्भातला एक ‘ग्लोबल वेब इंडेक्स’ नुकताच सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार एक इंटरनेट वापरकर्ता सरासरी 2 तास 22 मिनिटे इंटरनेटवर घालवतो. या अहवालानुसार सध्याच्या काळात लोक पूर्वीपेक्षा दिवसभरातील जास्त वेळ इंटरनेटवर घालवायला लागले आहेत. अहवालानुसार गेल्या 12 महिन्यांत 10 लाख नवे वापरकर्ते जगभरातून सोशल मीडियाला नव्याने जोडले गेले आहेत. म्हणजेच सोशल मीडियाने प्रत्येक 1 सेकंदाला 12 नवे वापरकर्ते स्वतःशी जोडून घेतले आहेत. त्यात दिलेल्या माहितीनुसार पुरुषांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण हे स्त्रियांपेक्षा जास्त आहे. स्त्री 1 आणि पुरुष 1.2 असे हे प्रमाण आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱयांमध्ये ‘फेसबुक’ सर्वात जास्त लोकप्रिय असून फेसबुकवर 2.6 बिलियन ऑक्टिव्ह युजर्स आहेत, तर 2 बिलियन लोक फेसबुकच्याच मालकीच्या व्हॉट्सऍपचा वापर करण्यास प्राधान्य देतात. 16 ते 64 वयातील 95 टक्के इंटरनेट वापरकर्त्यांनी ते फेसबुकच्या जोडीला अजून एका इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात अशी कबुली दिली आहे. फेसबुकनंतर यूटय़ूबला सर्वात जास्त पसंती मिळालेली आहे. 16 ते 24 वयोगटातील अर्ध्याहून अधिक महिलांनी त्या एखाद्या विशिष्ट उत्पादनाची माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात असे नमूद केले आहे. सर्वात जास्त वेळ इंटरनेटवर व्यतीत करणाऱयांमध्ये फिलिपिन्समधील लोकांना पहिला नंबर देण्यात आला आहे. इथले लोक सरासरी दिवसाचे 4 तास इंटरनेटवर घालवतात. नायजेरियाचे लोक 3 तास 36 मिनिटे वेळ घालवत दुसऱया क्रमांकावर आहेत. हिंदुस्थान 2 तास 25 मिनिटे तर चीन 2 तास 19 मिनिटे अशा प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात.

आपली प्रतिक्रिया द्या