वेब न्यूज – चंद्रावर वस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

मानवी इतिहासामध्ये अंतराळ संशोधन हे नेहमीच कुतूहलाचा आणि आव्हानाचा विषय राहिले आहे, पण आता अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ एका अशा महत्त्वाकांक्षी मोहिमेवर काम करत आहे, जी विज्ञानाच्या सर्व मर्यादा पार करेल. चंद्रावर पहिले कायमस्वरूपी मानवी तळ उभारणे आणि अंतराळ प्रवासासाठी अणुऊर्जेचा वापर करणे हे नासाचे आताचे मुख्य लक्ष्य आहे. नासा आपल्या ‘आर्टेमिस’ (Artemis) मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘आर्टेमिस बेस कॅम्प’ उभारण्याची तयारी करत आहे. हा केवळ एक तात्पुरता थांबा नसेल, तर चंद्रावर मानवाचे कायमस्वरूपी वास्तव्य असेल. यामध्ये आधुनिक राहण्याची सोय, प्रयोगशाळा आणि चंद्रावरील संसाधनांचा वापर करणारी यंत्रणा असेल. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्रावर पाण्याचा आणि मौल्यवान खनिजांचा साठा असू शकतो, ज्याचा वापर भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी केला जाईल. हा बेस कॅम्प म्हणजे पृथ्वीबाहेर मानवाची पहिली मोठी वस्ती ठरेल.

सध्या आपण ज्या रासायनिक इंधनाचा वापर करतो, त्याद्वारे मंगळावर जाण्यासाठी किमान 7 ते 9 महिने लागतात. मात्र, नासा आता ‘DRACO’ (Demonstration Rocket for Agile Cislunar Operations) प्रकल्पांतर्गत अणुऊर्जेवर (Nuclear Thermal Propulsion) चालणारे अंतराळयान विकसित करत आहे. अणुऊर्जेमुळे इंधनाची कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढते. त्यामुळे मंगळावरचा प्रवास केवळ 3 ते 4 महिन्यांत पूर्ण करणे शक्य होईल. प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे अंतराळवीरांना अवकाशातील किरणोत्सर्गाचा धोकाही कमी होईल. नासाच्या या हालचाली केवळ विज्ञानापुरत्या मर्यादित नाहीत. चंद्रावर तळ उभारल्यामुळे भविष्यात ‘स्पेस टुरिझम’ आणि ‘स्पेस मायनिंग’ला मोठी चालना मिळणार आहे. हा तळ मंगळ आणि त्यापुढील ग्रहांच्या प्रवासासाठी एक ‘लाँचिंग पॅड’ म्हणून काम करेल. रशिया आणि चीनसारखे देशही या शर्यतीत आहेत, परंतु अणुऊर्जेचा वापर करण्यात नासाने घेतलेली ही आघाडी त्यांना जागतिक अंतराळ राजकारणात वरचढ ठरवू शकते.