
>> स्पायडरमॅन
असे म्हणतात की, देव सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही म्हणून त्याने आई बनवली. आई ही प्रत्येकाच्या हृदयात वसलेली असते. लहानसहान चुका पाठीशी घालणारी, मात्र जाणीवपूर्वक केलेल्या चुकीवर कठोर शिक्षा करणारी, वडिलांच्या रागापासून पाठीशी घालणारी आणि प्रत्येक संकटात आपल्या आधी पुढे येऊन त्या संकटाचा सामना करणारी. अशी कितीतरी आईची रूपे आपण अनुभवत असतो. मात्र सगळ्याच गोष्टीत काहीतरी आगळेवेगळे करणाऱ्या चायनामध्ये सध्या पुरुषांनी आईचे रूप घेण्याचा जगावेगळा ट्रेंड सुरू झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता हा ट्रेंड जगभर पसरत चालला आहे.
या ट्रेंडची सुरुवात एका चायनीज मुलीच्या पोस्टने झाली. तिने लिहिले होते की, ती सध्या एक प्रबंध लिहिते आहे आणि त्या कामामुळे तिला अतिशय थकवा आलेला आहे. अशा वेळी तिला एका पाच मिनिटांच्या जादूच्या झप्पीची अर्थात प्रेमळ मिठीची आवश्यकता आहे. लहानपणी शाळेत तिला अशी एक झप्पी मिळाली होती आणि त्या वेळी तिला खूप आरामदायी वाटले होते. आतादेखील तिला एक अशी मिठी हवी आहे आणि ती त्यासाठी पैसेदेखील मोजायला तयार आहे. तिच्या या पोस्टनंतर तिला हजारो तरुणांचे प्रतिसाद आले आणि ते या कामासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांच्या या प्रतिसादानंतर तिथल्या कामाला कंटाळलेल्या अनेक तरुणींनी अशी आईप्रमाणे प्रेमाची मिठी देणारे तरुण शोधायला सुरुवात केली आणि बघता बघता हा प्रकार अतिशय लोकप्रिय झाला. मुख्य म्हणजे काही मुलीदेखील अशी आईची मिठी देण्याच्या कामात सहभागी झाल्या आहेत. मात्र या कामासाठी पुरुषांना अधिक पसंती मिळत आहे. हे पुरुष अशा कामाचे 250 ते 600 रुपये आकारत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अशा पाच मिनिटांच्या मिठीसाठी बागा, शॉपिंग मॉल, रेल्वे स्टेशन अशी सार्वजनिक ठिकाणे निवडण्यात येत असल्याने सुरक्षेचीदेखील काळजी आपोआप घेतली जाते.