वेब न्यूज – स्मार्टफोन्सला सॅनिटायझरचा धोका

2065

>> स्पायडरमॅन

कोरोना संक्रमणाच्या काळात डॉक्टर्स आणि दवाखान्यांच्या बाहेर लागलेल्या रांगा आपण पाहत आहोत, पण सध्या मोबाईल दुरुस्ती करणारे किंवा मोबाईल कंपन्यांच्या अधिकृत सर्व्हिस सेंटर बाहेरदेखील जोरदार रांगा लागलेल्या आहेत. या कोरोना संक्रमणाच्या काळात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनपासून ते साबण कंपन्यांच्या जाहिरातींपर्यंत सगळे तुम्हाला वारंवार स्वच्छता ठेवायला आणि हात साबणाने किंवा सॅनिटायझरने धुवायला सांगत आहेत, जोडीलाच तुमच्या सतत हाताळल्या जाणाऱया वस्तू देखील सॅनिटाईझ करायचा सल्ला सगळे देत आहेत. सध्या सगळ्यात जास्त हाताळली जाणारी वस्तू म्हणजे आपला फोन आहे आणि त्यामुळेच या फोनच्या बाबतीत कोटय़वधी लोक फारच काळजी घेताना दिसत आहेत. या फोनची कोरोनापासून कशी सुरक्षा करावी या विवंचनेत अनेक लोक फोनवरदेखील सॅनिटायझरचा मारा करत आहेत. मात्र या सॅनिटायझरच्या वापराने अनेकदा फोनचा डिस्प्ले किंवा कॅमेऱयाच्या लेन्सला इजा होऊन फोन खराब व्हायच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे असे बिघडलेले फोन दुरुस्त करण्यासाठी आता मोबाईल दुरुस्ती करणारी दुकाने किंवा मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरबाहेर रांगा लागल्या आहेत. सॅनिटायझरच्या अति वापराने फोनला धोका निर्माण होत असेल तर नक्की करावे काय? हा प्रश्न अनेकांना पडला आहे, पण यावर एक साधा उपाय म्हणजे सध्या लॉकडाऊनच्या काळातही अत्यावश्यक सेवा म्हणून चालू असलेली आपली मेडिकल शॉप्स होय. या दुकानांमध्ये ’मेडिकल वाइप्स’ नावाने सफाईचे टिश्यू पेपर्स मिळतात, जे वापरून आपण आपला मोबाईल सर्व बाजूंनी व्यवस्थित सॅनिटाईझ करू शकतो आणि त्याला जंतूपासून मुक्त ठेवू शकतो. या पेपरमुळे आपल्याला सॅनिटायझर स्प्रे करण्याची गरजही पडत नाही आणि सॅनिटायझरच्या वापराने आपल्या फोनचा डिस्प्ले किंवा हेडफोनच्या जॅकला जे नुकसान होते तेदेखील टाळता येते. याचबरोबर आपण रबिंग अल्कोहोलचा वापर करूनदेखील आपला मोबाईल स्वच्छ ठेवू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या