वेब न्यूज – टेलिमेडिसीनची उपयुक्तता

>>  स्पायडरमॅन

हेल्थकेअर अर्थात आरोग्यसेवा क्षेत्रात बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रचंड मोठी क्रांती आलेली आहे. गेल्या काही वर्षांत आपण ह्याचा अनुभव घेतोच आहोत. सध्या जगभरात कहर माजविलेल्या ह्या कोरोना रोगाच्या संकटकाळात तर ‘टेलिमेडिसीन’ तंत्रज्ञान तर सामान्य जनतेसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर रुग्णालये आणि खासगी डॉक्टरांकडे होणारी अनावश्यक गर्दीदेखील टाळता येणे शक्य होत आहे आणि डॉक्टरांनादेखील सहजपणे गरजूंशी संवाद साधणे, उपाय सुचविणे सहजसोपे झाले आहे. कोरोनाच्या धास्तीने रुग्णालयात धाव घेण्याऐवजी किंवा खासगी दवाखान्यात गर्दी करण्याऐवजी लोक आता फोन अथवा व्हिडीओ कॉल्सच्या मदतीने डॉक्टरांशी थेट संवाद साधण्यावर भर देत आहेत. अनेक डॉक्टर, हेल्थकेअर प्रोफेशनल्स आणि कन्सल्टंटनी टेलिमेडिसीन सेवा क्षेत्रात कोरोनाच्या काळात प्रचंड वाढ झाल्याचे सांगितले. अनेक लोकांच्या घरी वृद्ध किंवा अपंग रुग्ण असून, सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात त्यांना अशा रुग्णांना विविध आजारांच्या काळात रुग्णालयात नेणे जिकरीचे होत आहे. मात्र, ह्या टेलिमेडिसीन तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना सहज व पटकन रोगांचे निदान व इलाज मिळत असल्याने त्यांना त्याचा खूपच फायदा होत आहे. ह्यामुळेच देशात शक्य असेल तेथे अशा प्रकारची सेवा सुरू करण्यात यावी, असे तज्ञ सांगत आहेत. ह्यापूर्वी शरीरात आजाराची काही लक्षणे जाणवल्यास किंवा एखाद्या आजारावर, त्यावरच्या इलाजाची विस्तृत माहिती घेण्यासाठी दिवसाला साधारण दहा किंवा कमीच फोन येत असत. मात्र, आता कोरोनाच्या काळात ही संख्या 100 च्या वर पोहचली असल्याचे डॉक्टर सांगतात. तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांपर्यंत पोचल्याने आता अनेक जण डॉक्टरांना थेट व्हिडिओ कॉल करण्यावर भर देत आहेत. ह्यामुळे काहींना थेट डॉक्टरांसमोर बसूनच चर्चा केल्याचे समाधान मिळत आहे. अर्थात अशा प्रकारे दूरवरून संवाद साधून डॉक्टर औषधी सुचवू शकतात का? ह्या टेलिमेडिसीन क्षेत्रासाठी कोणते कायदे व नियम लागू आहेत, याबद्दल अनेक जण संभ्रमात असल्याचे दिसते. रुग्णाला प्रत्यक्ष तपासणे आणि व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे क्रीनिंगच्या मदतीने इलाज सुचविणे ह्याची तुलना करणेच शक्य नाही, असे काही आरोग्य क्षेत्रातील तज्ञ ठामपणे सांगतात. टेलिमेडिसीनच्या मदतीने लोक मोठय़ा प्रमाणावर आयुर्वेदिक डॉक्टरांचीदेखील मदत घेताना दिसत आहेत. घरगुती उपायांबरोबरच अनेक लोक आयुर्वेदाची मदतदेखील मोठय़ा संख्येने घेत असल्याचे ह्या क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या