‘वेडिंगचा शिनेमा’मधील तिसरे गाणे प्रदर्शित

सामना प्रतिनिधी । मुंबई

संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची गाणी प्रख्यात कवी संदीप खरे यांनी लिहिली आहेत. या चित्रपटाचे तिसरे गाणे ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं…कुणी जेवल्यावाचून नाही जायचं हं….’ प्रकाशित करण्यात आले. हे गाणे डॉ. सलील कुलकर्णी यांचे पुत्र शुभंकर यांनी गायले आहे. पक्या शहाणे हा परी प्रधानला मागणी घालतो आणि त्यांचे लग्न ठरते. या लग्नाची लगबग सुरू होते आणि त्याचे निमंत्रण पक्याचे भाचे गाणे गाऊन देतात. ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं…कुणी जेवल्यावाचून नाही जायचं हं….माझ्या मामाच्या लग्नाची गेली बातमी काऱयाला…’ हे गाणे निर्मात्याने नुकतेच प्रकाशित केले. 14 वर्षीय शुभंकर सलील कुलकर्णी याने हे गाणे गायले आहे. या गाण्यात त्याला आर्या आंबेकर आणि प्रसनजीत कोसंबी यांनी साथ दिली आहे. हा चित्रपट 12 एप्रिल 2019 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे.