
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदारांना थेट आवाहन करत, “मला सर्व 294 मतदारसंघांमध्ये तुमचा उमेदवार समजा,” असे म्हटले. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील चंद्रकोणा येथील प्रचारसभेत त्यांनी हे विधान केले.
या सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी व्यक्तीपेक्षा नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार असून, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी स्वतःला संपूर्ण राज्यातील निवडणुकीचे प्रमुख चेहरा म्हणून पुढे केले.
दरम्यान, त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आत्मविश्वासाने प्रचार सुरू ठेवला आहे. 2021 च्या निवडणुकीत नंदीग्राम येथे अधीकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता.
या सभेत त्यांनी मतदार यादीतील अनियमिततेचाही मुद्दा उपस्थित केला. तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषके बॅनर्जी यांच्या माहितीनुसार, एका दिवसात सुमारे 30,000 नवीन मतदार नोंदणी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी कोलकात्यातील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धाव घेतली होती, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
भाजपवर हल्लाबोल करत त्यांनी आरोप केला की, बिहार, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील मतदारांना बंगालच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “भाजप बाहेरच्या मतदारांना रेल्वेमार्गे आणण्याची योजना आखत आहे, जशी त्यांनी बिहारमध्ये केली होती,” असा आरोप त्यांनी केला.
याशिवाय, भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात संगनमत असल्याचा आरोप करत, मतदार यादीतून काहींची नावे वगळली जात असल्याचेही त्यांनी म्हटले. “लोकांचे नागरिकत्व, घटनात्मक आणि लोकशाही हक्क हिरावले जात आहेत. आम्ही याविरोधात शेवटपर्यंत लढू,” असा इशारा त्यांनी दिला.
भाजप सत्तेत आल्यास बंगालमध्ये सांस्कृतिक आणि धोरणात्मक बदल लादले जातील, असा दावा करत त्यांनी “मांसाहारावर बंदी घालण्याचा प्रयत्न होईल” तसेच ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ (NRC) मागच्या दाराने लागू केली जाईल आणि काही नागरिकांना डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवण्याची शक्यता असल्याचा आरोप केला.



























































