प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का; एक मंत्री आणि एका आमदाराने दिला राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल सरकारमध्ये परिवहनमंत्री असणारे शुभेंदू अधिकारी हे मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सरकारबाहेर पडले आहेत. त्यापाठोपाठ आमदार मिहिर गोस्वामी हेदेखील राजीनामा देत तृणमूल कॉँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून तृणमूल काँग्रेसमधील नाराज मंत्री व आमदारांना गळास लावण्यास सुरुवात केली आहे. त्यातच शुभेंदू अधिकारी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहत होते. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा प. बंगालच्या राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे आमदार मिहिर गोस्वामी यांनीदेखील राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजप खासदार निशीत प्रमाणिक यांच्या सोबत त्यांनी दिल्ली गाठली आहे. तृणमूल काँग्रेसचे आणखी काही नेते आणि कार्यकर्ते पक्षात येणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

शुभेंदू ममतांना पर्यायी नेतृत्व?

संघटनात्मक कौशल्यामुळे शुभेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी पर्यायी नेतृत्व म्हणून समोर आले होते. दोन वेळा खासदार राहिलेले शुभेंदू हे नंदिग्राममधील आंदोलनामुळे चर्चेत आले होते. या आंदोलनाने बंगालच्या राजकारणाची दिशा बदलली होती. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास तृणमूल कॉँग्रेसचे मोठे नुकसान होऊ शकते.