
पश्चिम बंगालमध्ये उद्या 29 एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक अधिकारी ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट यंत्रांसह मतदान यंत्रणा घेऊन विविध मतदान केंद्रांकडे रवाना झाले. बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात 142 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यातील लढाई तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भागात होणार आहे. तृणमूल काँग्रेस हा गड राखणार का, यावर बंगालच्या सत्तेचे समीकरण ठरणार आहे. याचा उलगडा 4 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच होईल.
बंगालमध्ये 23 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. पहिल्या टप्प्यात विक्रमी 93 टक्के मतदान नोंदविण्यात आले. या टप्प्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. आता अखेरच्या टप्प्यात कोलकाता, हावडा, उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, नाडिया, हुगळी आणि पूर्व बर्धमान या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. हा तृणमूल काँग्रेसचा गड मानला जातो. गेल्या निवडणुकीत येथील 142 जागांपैकी 123 जागा तृणमूलने जिंकून वर्चस्व कायम राखले होते. भाजपला केवळ 18 जागाच जिंकता आल्या होत्या. भाजपने गेल्या वेळी हा गड भेदण्यासाठी प्रचंड जोर लावला होता. मात्र ममता बॅनर्जी यांनी भाजपला जोरदार टक्कर देत आपला गड अभेद्य ठेवला. या वेळी काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाच राज्यांची 4 मे रोजी मतमोजणी
पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुच्चेरी येथील विधानसभांच्या निवडणुका झाल्या. या सर्व विधानसभांसाठी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष
पश्चिम बंगालमधील एका लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही लढत आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांची. गेल्या निवडणुकीत अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम येथून 1,956 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्या भवानीपूर येथील पोटनिवडणुकीत 58 हजार मतांनी जिंकल्या. या वेळी दोन्ही नेते याच मतदारसंघात आमनेसामने आहेत.























































