कोलकात्यात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनांनी काढलेल्या निषेध मोर्चानंतर भाजपने आज 12 तासांच्या ‘बंगाल बंद’ची हाक दिली होती, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाता करणाऱ्या भाजपच्या पश्चिम बंगाल बंददरम्यान हिंसाचार झाल्याचे समोर आले आहे. बंददरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली. शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले. उत्तर 24 परगणा जिह्यात भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार झाला. तसेच बॉम्ब फेकण्यात आले. यात चालकासह दोघांना गोळ्या लागल्या असून एक गंभीर आहे. दरम्यान, भाजप बंद करून राज्याची बदनामी करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
आरोपीला फक्त फाशी; शिक्षेसाठी विधेयक आणणार – ममता बॅनर्जी
पुढच्या आठवड्यात विधानसभेचे अधिवेशन बोलावू आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी 10 दिवसांत विधेयक मंजूर करू आणि ते राज्यपालांकडे पाठवू. त्यांनी ते मंजूर न केल्यास आम्ही राजभवनाबाहेर आंदोलन करू. राज्यपाल जबाबदारीतून सुटू शकत नाहीत, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
बस! आता खूप झाले मी निराश आणि भयभीत – राष्ट्रपती मुर्मू
कोलकात्यातील घटनेनंतर देशभरात महिला सुरक्षेच्या दृष्टीने एनडीए सरकारच्या पोकळ धोरणांविरोधात प्रचंड संताप व्यक्त होतोय. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. बस आता खूप झाले, कोलकाता घटना प्रचंड वेदनादायी आणि भयावह असून मी प्रचंड निराश आणि भयभीत झाले आहे. महिलांविरोधातील या विकृतींविरोधात देशाने जागे होण्याची वेळ आली आहे, असे मुर्मू यांनी म्हटले आहे.