
सामना ऑनलाईन । कोलकाता
देशभरात विविध भागात मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. आता पश्चिम बंगालमध्येही मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. जलपाईगुडीमध्ये मूले चोरी करण्याच्या संशयावरून ४ महिलांना जमावाने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत दोन महिलांचे कपडेही फाटले. मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांमुळे कठोर कायदा बनवण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे.
पश्चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यात मुले चोरी करण्यासाठी महिला आल्याची अफवा पसरली. त्यानंतर जमावाने चार महिलांना बेदम मारहाण केली. जमाव एवढा बेभान झाला होता की, दोन महिलांचे कपडेही फाडण्यात आले. पोलिसांनी त्या चार महिलांची जमावाच्या ताब्यातून सुटका करून त्यांना सुखरुप घरापर्यंत पोहचवले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्रातील राईनपाडा येथे सोशल मिडीयावरून पसरलेल्या अफवेमुळे जमावाने केलेल्या मारहाणीत पाचजणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर फेक न्यूज आणि सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती.

























































