पाश्चिमात्य मातृदेवता

स्वरा सावंत,[email protected]

आपल्याकडची देवी उपासना परदेशातही आहे. आपल्याकडे कधी काळी असणारी मातृसत्ताक पद्धती परदेशातही रूजलेली आहे. त्यांच्याही स्त्रीदेवता आणि त्यांचे स्वरूप मोठे मनोहारी आहे.

आपल्याला जशी समृद्ध हिंदुस्थानी संस्कृती लाभली तशीच हिंदुस्थानच्या सीमेपलीकडे स्त्रीशक्ती जोपासणाऱया अनेक प्रमुख संस्कृती आहेत. विविध पंथांतल्या, राष्ट्रांतल्या या स्त्रीशक्तीचा जागर अखंड चालू असतो. आपल्या येथे साजऱया होणाऱया नवदुर्गा उत्सवाच्या निमित्ताने सीमेपलीकडच्या आदिशक्तींचा घेतलेला आढावा…

आयसिस

इजिप्शियन पंथातली ही प्रमुख देवता. हिच्या नावाचा अर्थच मुळी ‘सिंहासन’ असा होतो. इजिप्शियन संस्कृतीला शोभेल असा सिंहासनाधीश थाट या देवीचा आहे. सूर्यचक्र आणि गाईची शिंगे असे स्वरूप असलेल्या या देवतेच्या पूजेने आजारी व्यक्तीला पूर्ण बरे करता येते, तर मेलेल्या व्यक्तीला जिवंत करता येते असा समज येथील भाविकांचा आहे.

फ्रेया

प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणाऱया या देवतेला मॅजिकच्या (जादू)  दुनियेत अधिक मानले जाते. जगात जागतिक पातळीवर काम करणारे जादूगार या देवतेला विशेष मानतात. या देवतेला प्रसन्न करण्यासाठी मांसाहाराचा तसेच मधाने बनवलेल्या पदार्थांचा भोग चढवला जातो.

बास्ट

इजिप्तमध्ये युद्धावर जाताना या देवतेला पुजले जाते. मांजरीच्या चेहऱयासारखा काहीसा मिळताजुळता या देवतेचा थाट आहे. हीसुद्धा कलाप्रिय देवता असून संगीत, आत्मिक आनंद याची भोक्ती आहे. बास्ट किंवा बास्टेट असे या देवीला संबोधले जाते. परफ्यूम्स, अत्तर किंवा अन्य सुगंधी द्रव्ये या देवतेला प्रिय आहेत. कोणतेही काम करण्यापूर्वी या देवतेला सुगंधी द्रव्याचा मान दिला जातो.

ब्रिजिड

आयर्लंडमधील प्रमुख देवता म्हणून प्रसिद्ध असलेली ब्रिजिड ही सेल्टिक पंथाची मुख्य देवता आहे. कलेची भोक्ता असणारी ही देवता कवी, धातुकाम करणाऱयांची संरक्षक देवता असल्याचे मानले जाते. एम्बोल्स्क भागात वसंत ऋतूत म्हणजेच आयर्लंडच्या फेब्रुवारी महिन्यात या देवतेचा उत्सव साजरा केला जातो. आयर्लंडमधील नागरिक या देवतेच्या नावाने असलेल्या विहिरींमध्ये आपल्या आजारांवरील उपचारांसाठी नाणं टाकून या देवतेचा कौल घेतात. याद्वारे योग्य उपचार करता येतात असा त्यांचा समज आहे.

 क्युआन थिन

बौद्ध धर्मपंथाची ही देवता प्रामुख्याने करुणा, शांतताप्रिय मार्गाशी जोडलेली आहे. क्युआन थिन या नावाचा अर्थच मुळात सर्वांचे म्हणणे किंवा दुःखी लोकांचे म्हणणे शांततेत ऐकून घेणं असा होतो. त्रासलेल्या जिवांना दया दाखवून त्यांचे दायित्व स्वीकारलेल्या या देवतेला गोडाचा प्रसाद दाखवला जातो. जगात बौद्ध धर्म असलेल्या राष्ट्रांमध्ये ही देवता पुजली जाते. या देवतेला केब्स, कमळाचा सुगंध, फळे, फुले अधिक प्रिय आहेत.

अथेना

योद्धय़ांची ही देवता बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. ग्रीक प्रांतात प्रामुख्याने या देवतेला पुजले जाते. धैर्य, शक्ती प्रदान ही देवता असली तरी कला आणि साहित्यही या देवतेला प्रिय आहे. घुबडासारखा दिसणारा गंभीर चेहरा या देवतेला असून या ऑलिव्ह फळाशी या देवतेचा संबंध जोडला जातो. ग्रीस, अथेन्स या भागात या देवतेचे भाविक मोठय़ा संख्येने आढळतात. युद्धाच्या काळात संरक्षणासाठी या देवतेचा जागर केला जातो.

मझू

चायनीज बुद्धिस्ट देवता. समुद्रदेवता म्हणूनही ओळखले जाते. खोल समुद्रात जहाज किंवा होड्या घेऊन जाणाऱया नाविकांची ही देवता असल्याने कोणत्याही कामगिरीकर निघताना या देवीला पुजले जाते. दहाव्या शतकात लिन मो नियंग नामक महिलेवरून या देवीचे हे नाव ठरले. या महिलेने आपल्या प्रबळ शक्तीच्या जोरावर अनेक भाविकांना बरे करण्याची जादू केली होती. तेव्हापायून समुद्रतटाकर राहणारा समुदाय या देवीचे पूजन करू लागला.

 

आपली प्रतिक्रिया द्या