
पश्चिम रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर चेहरा ओळखण्याची प्रणाली (एफआरएस) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या माध्यमातून प्रवाशांच्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. कुठलाही संशयित वा सराईत गुन्हेगार, फरार आरोपी रेल्वे स्थानक परिसरात फिरकताच त्याचा चेहरा ‘एफआरएस’मध्ये टिपला जाणार आहे. त्याद्वारे आरोपीला सहज पकडले जाणार आहे. त्यादृष्टीने ‘एफआरएस’ प्रणाली हाताळण्यासाठी आरपीएफचे तज्ञ कर्मचारी दिवसरात्र कार्यरत राहणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या प्रमुख स्थानकांत एफआरएस प्रणाली कार्यान्वित केली आहे. यात चर्चगेट, दादर, वांद्रे, बोरिवली, अंधेरी, मालाड, वसई रोड, नालासोपारा, विरार आदी स्थानकांचा समावेश आहे. या प्रणालीचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधी स्थानिक पोलीस ठाण्यांनाही सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने कर्मचाऱयांना प्रोत्साहन देत आहोत, असे भारतीय रेल्वे सुरक्षा बल सेवा मुंबई विभागाचे सुरक्षा आयुक्त रजत कुंडगीर यांनी सांगितले. ही प्रणाली रेल्वे प्रवाशांची सुरक्षा भक्कम करेल असे ते म्हणाले.
मुंबई पोलिसांनाही मोठी मदत होणार
मुंबईत गुन्हे करून परराज्यात पलायन करणाऱयांचे प्रमाण अधिक आहे. एफआरएस प्रणालीमुळे फरार गुन्हेगारांचा रेल्वे स्थानकांत वेळीच ‘थांगपत्ता’ लावता येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध पोलीस ठाणी तसेच जीआरपीचे अधिकारी सध्या आरपीएफकडे संपर्क साधत आहेत. त्यांनी दिलेल्या फोटोशी साम्य असलेल्या व्यक्तीचा चेहरा एफआरएस प्रणालीमध्ये टिपल्यास त्याचे फुटेज संबंधित मुंबई पोलीस वा जीआरपीकडे शेअर केले जाणार आहे.
गुन्हेगार दिसताच आरपीएफला मेसेज!
एफआरएस प्रणालीत फरार गुन्हेगार वा बेपत्ता व्यक्तींचा फोटो अपलोड केला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्ती एफआरएस प्रणाली कार्यान्वित असलेल्या कोणत्याही स्थानकांत कुठल्याही भागात दिसताच त्या व्यक्तीबाबत आरपीएफला लगेच मेसेज येतो. अपलोड केलेल्या फोटोशी 85 टक्के साम्य असलेल्या सर्व व्यक्तींचा चेहरा एफआरएस प्रणालीमध्ये टिपला जातो. त्या साहाय्याने बेपत्ता व्यक्ती ताब्यात घेण्यासाठी वा फरार गुन्हेगाराला अटक करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाते.