
पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना शुक्रवारी सकाळी तांत्रिक बिघाडाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. बोरिवली रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल सेवेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. सर्वच रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी उसळली. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मागील अनेक दिवसांपासून पश्चिम रेल्वेचा प्रवास जीवघेणा बनला आहे. रोज 15 ते 20 लोकल फेऱया रद्द करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर ओढवली आहे. शुक्रवारी सकाळी बोरिवली येथील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल झाले. ऐन गर्दीच्या वेळी दोन्ही दिशेला जाणाऱया गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडल्याने नोकरदारांची रखडपट्टी झाली. याचदरम्यान एसी लोकल फेऱयांचाही गोंधळ झाला. काही एसी लोकल फेऱ्यांच्या जागी नॉन-एसी लोकल चालवण्यात आल्याने नियमित प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.
रेल्वे प्रशासन झोपलेय!
प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या ढिसाळ कारभारावर सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. रोज लोकल ट्रेनच्या 10 ते 15 मिनिटे विलंबाची सवय झाली आहे. ट्विट करून थकलोय, तरीही रेल्वे प्रशासन अद्याप झोपलेय, अशी प्रतिक्रिया ‘एक्स’वर एका प्रवाशाने नोंदवली. अनेकांनी रेल्वे मंत्र्यांना ‘टॅग’ केले आणि आपण आमचा वेळ घालवत असल्याचा संताप व्यक्त केला.






























































