पश्चिम रेल्वेच्या 40 अतिरिक्त फेर्‍या, ‘परे’च्या एकूण फेर्‍यांची संख्या आता 202

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
western-railway-local
प्रातिनिधिक फोटो

‘अनलॉक 1.0’ अंतर्गत मुंबईत अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी चालविण्यात येत असलेल्या उपनगरीय लोकलच्या फेर्‍यांमध्ये पश्चिम रेल्वेने सोमवार 29 जूनपासून 40 फेर्‍यांनी वाढ करीत एकूण 202 फेर्‍या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या विनंतीनूसार उपनगरीय लोकलमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांनाही प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अशा वाढविल्या 40 फेर्‍या

पश्चिम रेल्वेने सोमवारपासून 40 नव्या फेर्‍या वाढविल्या असून चर्चगेट ते बोरीवली दरम्यान 20 सेवा वाढविल्या आहेत. (10 अप आणि 10 डाऊन), बोरीवली आणि विरार दरम्यान डाऊन दिशेला धिम्या मार्गावर 2 अतिरिक्त फेर्‍या, वसई ते चर्चगेट  दरम्यान अप दिशेला 2 जलद फेर्‍या, बोरीवली ते विरार दरम्यान अप दिशेला दोन धिम्या फेर्‍या, तसेच चर्चगेट ते विरार दरम्यान 14 जलद सेवा (8 डाऊन दिशेला तर 6 अप दिशेला) अशा एकूण चाळीस फेर्‍या पश्चिम रेल्वेने वाढत्या गर्दीला सामाविण्यासाठी वाढविल्या असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

देशभरातील लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून बंद असलेली मुंबईची उपनगरीय लोकल सेवा 84 दिवसांनी सोमवार 15 जूनपासून राज्य सरकारच्या विनंतीनूसार अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी मर्यादित प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने 200 तर पश्चिम रेल्वेने 162 सेवांद्वारे प्रारंभ केला होता. या सेवांमध्ये केवळ राज्य सरकारचे अत्यावश्यक कर्मचारी आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचार्‍यांनाच प्रवेश दिला जात आहे.

शिवसेना स्थानीय लोकाधिकार महासंघाची मागणी
‌
उपनगरीय लोकलमध्ये केंद्र सरकारच्या बँक आणि पोस्टल कर्मचार्‍यांसह अन्य केंद्रिय कर्मचार्‍यांना प्रवेश देण्यात येत नव्हता. त्यामुळे नाराजी व्यक्त झाली होती. यासंदर्भात शिवसेना स्थानीय लोकाधिकार महासंघ व टपाल कर्मचारी सेनेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी रेल्वे बोर्डाला पत्र लिहून बँक आणि इतर कर्मचार्‍यांना अत्यावश्यक लोकलमध्ये प्रवेश द्यावा अशी विनंती केली आहे.