
पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या रविवारच्या ‘ब्लॉक’ नियोजनाचे तीनतेरा उडाले आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एकाच दिवशी तब्बल 254 लोकल फेऱया रद्द केल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी उसळली. यादरम्यान स्थानकांतील इंडिकेटर्स बंद ठेवण्यात आले. तसेच रद्द फेऱयांबाबत कोणतीही अनाऊन्समेंट केली नाही. त्यामुळे दिवसभर गोंधळाचे वातावरण राहून प्रवाशांची त्रेधातिरपीट उडाली.
कांदिवली ते बोरिवली स्थानकांदरम्यान पुलाच्या गर्डरचे काम करण्यासाठी दोन दिवस मोठा ब्लॉक घेण्यात आला होता. यादरम्यान शनिवारी रात्री 45, तर रविवारी 254 लोकल फेऱया रद्द करण्यात आल्या. मोठय़ा प्रमाणावर लोकल फेऱया रद्द करताना प्रवाशांना अनाऊन्समेंटद्वारे योग्य प्रकारे माहिती दिली जात नव्हती. रेल्वे स्थानकांतील इंडिकेटर्सवर वेळेच्या ठिकाणी ‘शून्य’ आकडे दाखवले जात होते. लोकल ट्रेन येईल या आशेने प्रवाशांनी प्लॅटफॉर्मपासून ते पुलापर्यंत गर्दी केली होती. यात प्रवाशांची तासन्तास रखडपट्टी झाली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.
अनेक प्रवासी ‘मेट्रो’कडे वळले
अर्धा ते पाऊण तास रेल्वे स्थानकांत रखडलेले प्रवासी पर्यायी व्यवस्था म्हणून मेट्रोकडे वळले. त्यामुळे वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो मार्गिकेवर प्रवाशांची गर्दी झाली होती. तसेच दादरच्या दिशेने येणाऱया प्रवाशांनी भुयारी मेट्रोचा आधार घेतला. पश्चिम रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे लोकल प्रवाशांना ही धावाधाव करावी लागली.
प्रशासनाने प्रवाशांना वाऱयावर सोडले!
पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. मागील कित्येक दिवसांपासून पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ढेपाळली आहे. नियमित वेळापत्रकात एसी लोकल फेऱयांची संख्या वाढवली. मात्र त्याचवेळी दररोज 15 ते 20 साध्या लोकल फेऱया रद्द करून सामान्य प्रवाशांचे हाल केले आहेत. रविवारीही साध्या लोकलच्या प्रवाशांना वाऱयावर सोडण्यात आले, अशी नाराजी मालाड येथील प्रवाशांनी व्यक्त केली.

























































