ए.एच व्हीलरचे 55 स्टॉल्स बंद, पश्चिम रेल्वेचा निर्णय; 72 तासांत जागा रिकामी करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवर दीर्घकाळापासून ओळख असलेल्या ए.एच व्हीलर या कंपनीला पश्चिम रेल्वेने मोठा झटका दिला आहे. मुंबई सेंट्रल विभागातील 55 मल्टी-पर्पज स्टॉल्स मधील विक्री तत्काळ थांबवून 72 तासांच्या आत जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित पत्र 28 मार्च रोजी देण्यात आले असून 31 मार्चला नोटीसची मुदत संपत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

मुंबई सेंट्रल येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (वाणिज्य) कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, कराराची मुदत संपताच सर्व विक्री व्यवहार थांबवणे बंधनकारक आहे. तसेच करारातील अटींनुसार परवानाधारकाने 72 तासांत स्टॉल्स रिकामे करून रेल्वेच्या मालकीच्या सर्व वस्तू सुस्थितीत परत कराव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई विभागातील महत्त्वाच्या स्थानकांवर असलेले हे 55 स्टॉल्स सध्या मल्टी-पर्पज स्टॉल्स म्हणून कार्यरत आहेत. 1 एप्रिल 2021 पासून पाच वर्षांच्या कराराअंतर्गत पारंपरिक बुक स्टॉल्सचे रूपांतर करण्यात आले होते. हा करार 31 मार्च 2026 रोजी संपत आहे.

रेल्वे प्रशासनाने कंपनीला सर्व थकबाकी, परवाना शुल्क, वीज बिल, दंड आणि इतर शुल्क पूर्णपणे भरून मगच जागा हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच स्टेशन मॅनेजर्स आणि वाणिज्य निरीक्षकांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या स्टॉल्ससाठी नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, भविष्यातही या जागांचा व्यावसायिक वापर सुरू ठेवण्याचा रेल्वेचा मानस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इतिहासाचा शेवटचा टप्पा

ए.एच व्हीलर ही कंपनी 1877 साली अलाहाबाद (सध्याचे प्रयागराज) स्थानकावर स्थापन झाली होती. फ्रेंच व्यावसायिक एमिल एडवर्ड मोरू आणि टी.के. बॅनर्जी यांनी प्रवाशांना पुस्तके विकण्यास सुरुवात केली. मोरू यांचा इंग्लिश मित्र आर्थर हेन्री व्हीलर यांच्या नावावरून या ब्रँडचे नामकरण झाले.

लाकडी कपाटापासून सुरू झालेली ही छोटी सेवा पुढे देशभरातील रेल्वे स्थानकांवर विस्तारली आणि प्रवास संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली. सुप्रसिद्ध लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या सुरुवातीच्या लेखनाच्या प्रसारातही या कंपनीचा मोठा वाटा होता. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वे स्थानकांवरील एका ऐतिहासिक अध्यायाचा शेवट होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.