वेस्टर्न रेल्वेचे ‘यम है हम’! रूळ ओलांडणाऱ्यांना खांद्यावर उचलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरीय लोकल मार्गावर दररोज सरासरी दहा प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. त्यात सर्वाधिक संख्या ही रेल्वे रूळ ओलांडणाऱयांची असते. मृत्यूचा हा ‘शॉर्टकट’ रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेवर मृत्युदेवता यमाची एण्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे यमराज ‘हम है यम’ म्हणत रूळ ओलांडणाऱयांना खांद्यावर उचलून नेत आहेत.

मुंबईकर लोकल पकडताना बऱयाच वेळी ऑफिसचे मस्टर गाठण्यासाठी जिवावर उदार होत रेल्वे रूळ ओलांडतात. यासाठी पश्चिम रेल्वेने आरपीएफच्या मदतीने रेल्वेचे रूळ ओलांडणाऱयांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता कल्पकतेने त्यांना सुरक्षेचे धडे देत आहेत.

पश्चिम रेल्वेच्या या अनोख्या मोहिमेत ‘यमराज’च्या वेषात रुळांवर तैनात केलेले डमी यमराज प्रवाशांना रेल्वे क्रॉसिंगपासून रोखण्यासाठी अनोख्या पद्धतीने धडा शिकवीत आहेत. रेल्वे मंत्रालयाने देखील या मोहिमेचे कौतुक करीत हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. साक्षात ‘यमराज’च्या कॅरेक्टरद्वारे प्रवाशांना ‘यम है हम’ म्हणत रूळ ओलांडण्यापासून परावृत्त केले जात आहे. बेकायदेशीरपणे जीव धोक्यात घालून काही मिनिटांची बचत जरूर होईल; परंतु एका चुकीने लाखमोलाचा जीव जाऊन कुटुंब उघड्यावर येते. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडू नका, पुलाचा वापर करा असे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे.