
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवास नजीकच्या काळात वेगवान बनणार आहे. विरार ते डहाणू स्थानकांदरम्यान रेल्वेच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत अतिरिक्त मार्गिकांचे 41 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पालघर जिह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकातील लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा अडसर दूर होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प-3 अंतर्गत रेल्वे मार्गिकांच्या चौपदरीकरणाचे काम केले जात आहे. 3,578 कोटी रुपयांचा खर्च करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसीने डोळय़ासमोर ठेवले आहे. सध्या या प्रकल्पाचे 41 टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल्वे प्रकल्पांमध्ये भूसंपादनाचा मुख्यत्वे पेच असतो. चौपदरीकरणाच्या प्रकल्पांतर्गत भूसंपादन मार्गी लागले आहे. 29.17 हेक्टर खासगी जमीन, 10.26 हेक्टर सरकारी जमीन, 3.77 हेक्टर वन जमीन आणि 12.8 हेक्टर एनपीसीआयएलची जमीन संपादित करण्यात आली आहे. तसेच वन विभागाची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मंजुरी मिळाली आहे.
























































