
सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णतः नष्ट झाला आहे. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ सरसकट पंचनामे करावेत व महिनाभराच्या आत नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी छाईल येथील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना ग्रामस्थांनी निवेदनही दिले.
या वर्षी साक्री तालुक्यात पावसाळा होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना 20 जुलैनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून तालुक्यातील शेतकरी हैराण झालेला आहे. सुरुवातीलाच पिकांवर वेगवेगळय़ा रोगांचे संकट आले. त्या संकटातून मार्ग काढत असतानाच काही अंशी पिकांची परिस्थिती सुधारली. त्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्यपूर्ण सुरू असलेल्या पावसाने शेतकऱयांचे हातातोंडाशी येणारे पीकही पूर्णतः नष्ट केले आहे. तालुक्यात कांदा पिकाची मोठय़ा प्रमाणावर लागवड होत असते, परंतु विहिरींना पाणी नसल्यामुळे कांद्याचे पीक घेण्यात शेतकरी अपयशी ठरला आणि मका, भुईमूग, कपाशी, बाजरी आदी पिके पेरून शेतकरी समाधानी राहिला. पिकांची परिस्थिती समाधानकारक पावसामुळे उत्तम होती. मात्र नंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. आणि हातातोंडाशी आलेले संपूर्ण पीक या पावसामध्ये नष्ट झाले.
कपाशीच्या उमललेल्या कापसातून कोंब फुटलेले आढळून येत आहेत. रब्बीत कांद्याचा हंगाम चांगला जाईल म्हणून शेतकऱयांनी कांद्याचे बियाणे टाकले, तेही सर्व पावसामुळे नष्ट झालेले आहे. तसेच शेतांमध्ये पाणी साचल्याने जमीन अजून किमान दीड महिने तरी नवीन पिकासाठी तयार होऊ शकणार नाही. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकऱयांच्या पिकांचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा छाईल येथील सरपंच हिम्मत कुवर, पराग कुवर, रवींद्र कुवर, दगा कुवर, संगीता कुवर, नबा कुवर, माजी उपसरपंच देवीदास कुवर, उमेश कुवर, रावसाहेब कुवर, गुलाब कुवर, भाऊसाहेब कुवर, वंदना कुवर, आत्माराम कुवर, कल्पना कुवर, रामदास कुवर, युवराज कुवर, निर्मला कुवर, प्रवीण कुवर आदी शेतकऱयांनी साक्री तहसील कार्यालयात तहसीलदार चव्हाण यांना एका निवेदनाद्वारे दिला. तहसीलदार चव्हाण यांना दिलेल्या निवेदनावर शेकडो शेतकऱयांच्या स्वाक्षऱया आहेत.



























































