शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सध्या नाशिकमध्ये आहे. राज्यात अनेक समस्या असताना मुख्यमंत्री नाशिकमध्ये काय करत आहेत, असा रोखठोक सवालही त्यांनी केला. ते नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक तयारीसाठी आले असतील, तर या मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संदीप गुळवे हेच विजयी होणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री नाशिकमध्ये कशासाठी आले होते? राज्यात सध्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत आहे. अमरावतीमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. राज्यात अशी बिकट परिस्थिती असताना मुख्यमंत्री नाशिकमध्ये का आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांना निवडणुकीची खूप आवड आहे. नाशिक शिक्षक मतदारासंघाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ते आले असतील, तर आपले एवढेच सांगणे आहे की, नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संदीप गुळवे हेच विजयी होणार आहे. गुळवे हेच विजयी होतील, असा ठाम विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी लक्ष्मण हाके यांनी 10 दिवसांपासून संघर्ष केला. त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी प्रदीर्घ उपोषण केले. मात्र, सरकारने या दोन्ही समाजांना काय दिले किंवा सरकार काय देणार आहे, हा एक प्रश्नच आहे. या सर्व घडामोंडीमुळे राज्याचे सामजिक वातावरण आणि सलोखा बिघडू नये, हीच आमची इच्छा आहे. प्रत्येकाला त्याच्या हक्काचे आणि न्यायाचे मिळायला पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.