
ऐन दिवाळीत एकीकडे सूर्याला ग्रहण लागलेले असतानाच दुसरीकडे व्हॉट्सअॅपलादेखील दोन तासांचे ग्रहण लागले. मंगळवारी दुपारी 12 ते 12.30च्या सुमारास हिंदुस्थानसह जगभरात व्हॉट्सअॅपची सेवा विस्कळीत झाली. ऐन दिवाळीत आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शुभेच्छांचे मेसेज पाठवण्यात अडचणी येत असल्याने युजर्स अक्षरशः ‘मेटा’कुटीला आले. दुपारी सव्वादोनच्या सुमारास व्हॉट्सअॅपची सेवा पूर्ववत सुरू झाली.
व्हॉट्सअॅपची सेवा दुपारी ठप्प झाल्यानंतर युजर्सना पर्सनल किंवा ग्रुपवर मेसेज पाठवण्यात अडचणी येऊ लागल्या. अॅपवर केवळ कनेक्टिंग असे लिहिलेले दिसत होते परंतु मेसेज सेंड किंवा रिसिव्ह होत नव्हते.
ट्रकर डाऊन डिटेक्टर या वेबसाईटच्या माहितीनुसार महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आदी शहरातील तीन हजाराहून अधिक युजर्सनी याबाबतची तक्रार नोंदवली. सेवा बंद झाल्यानंतर तासाभराने मेटाचे प्रवत्ते म्हणाले, ‘काही लोकांना मेसेज पाठवण्यात अडचण येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पंपनी लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतेय. मात्र, पंपनीने या तांत्रिक बिघाडाचे कोणतेही कारण दिले नाही. त्यानंतर दुपारी 2.15 च्या सुमारास सेवा पूर्ववत सुरू झाली.
मीम्सचा पाऊस
जगभरात व्हॉट्सअॅपचे 2 अब्ज तर इंस्टाग्रामचे 1.38 अब्ज युजर्स आहेत. व्हॉट्सअॅप डाऊन होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाहायला मिळाला. चित्रपटांचे पोस्टर, डायलॉग असलेले भन्नाट मीम्स फेसबुक आणि ट्विटरवर शेअर करत युजर्स व्हॉट्सअॅपची खिल्ली उडवताना दिसत होते.
गतवर्षी सहा तास
सेवा ठप्प
व्हॉट्सअॅपची सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्यावर्षी 4 ऑक्टोबर रोजी रात्री 9.15 च्या सुमारास व्हॉट्सअॅप संपूर्ण जगभरात तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाले होते. याचा फटका अमेरिकन बाजारपेठेतील फेसबुकच्या शेअर्सना बसला होता. पंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी कोसळले होते.


























































