व्हॉट्सअॅपमध्ये आलंय ‘हे’ नवीन फिचर! लॉकडाऊनमध्ये होऊ शकतो याचा फायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या लॉकडाऊनमुळे सगळे जण घरात थांबले आहेत. त्यामुळे मित्रमंडळी, नातेवाईक यांना प्रत्यक्ष भेटणं शक्य नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे एकमेकांशी संवाद साधत आहेत. तर अशा मंडळींसाठी व्हॉट्सअॅपने एक खास फीचर आणलं आहे.

हे फीचर तसं नवीन नाही. फक्त व्हॉट्सअॅपने आता त्यात थोडा बदल केला आहे. व्हॉट्सअॅपच्या ग्रुप कॉलिंगची मर्यादा आता वाढवण्यात आली असून आता चार ऐवजी आठ जण या ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधू शकतात. या आधी चारपेक्षा अधिक जणांना संवाद साधण्यासाठी झूम किंवा गुगल ड्युओसारखी अॅप्लिकेशन वापरावी लागत होती. मात्र, आता व्हॉट्सअॅपमध्येही ही सोय उपलब्ध असणार आहे.

अँड्रॉईड आणि आयफोन धारकांसाठी व्हॉट्सअॅपच्या बिटा व्हर्जन v2.20.133 आणि v2.20.50.25 मध्ये हे फीचर उपलब्ध होईल. त्यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जनवर अपडेट करावं लागेल. त्यानंतर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कॉल करण्यासाठी तुम्हाला ग्रुप ओपन करावा लागेल. त्यात उजवीकडे वरती कॉल बटन क्लिक करावं लागेल. जर तुमच्या ग्रुपमध्ये आठहून अधिक सदस्य असतील तर अॅप्लिकेशन तुम्हाला त्यातले सदस्य निवडण्यासाठी पर्याय विचारेल. त्यातून तुम्हाला सदस्य निवडावे लागतील. पण, जर फक्त आठ सदस्यांचा ग्रुप असेल तर सरळ व्हिडीओ कॉल सुरू होईल.