
विधीमंडळ अधिवेशनात तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांना कुठून मिळाला, याची सखोल चौकशी करून तीन आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
विधीमंडळाच्या अधिवेशनात तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. त्यावरून प्रचंड टीका झाल्यानंतर कोकाटे यांचे कृषी खाते काढून क्रीडामंत्रीपद देण्यात आले. दरम्यान, कोकाटे यांनी रोहित पवार यांच्याविरोधात नाशिक न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे.
सोमवारी न्यायालयाने कोकाटे यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यावर गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. सी. नरवाडीया यांनी पवार यांच्याकडे हा व्हिडीओ कुठून आला, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. मुंबई नाका पोलीस ही सखोल चौकशी करणार आहेत, अशी माहिती कोकाटे यांचे वकील अॅड. मनोज पिंगळे यांनी दिली.