
कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या आजाराचा भविष्यात उद्रेक होऊ नये, अतिशय जोरकसपणे आणि ठाम निर्धाराने कोविडशी लढा देता यावा यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांनी आज ऐतिहासिक कराराला मंजुरी दिली. विविध देशांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. जिनेव्हा येथे डब्ल्यूएचओची वार्षिक परिषद पार पडली. याप्रकरणी तब्बल तीन वर्षे वादविवाद, चर्चा झाली. त्यानंतर आज झालेल्या वार्षिक परिषदेत सर्वच सदस्य देशांनी कोरोनाशी लढण्यासाठी करार करण्याला मंजुरी दिली.
भविष्यात संपूर्ण जग कोविडशी लढण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज असल्याचे बैठकीत डब्ल्यूएचओच्या सर्व सदस्य देशांनी नमूद केले. या करारावर औपचारिकरीत्या आज शिक्कामोर्तब करण्यात आले, परंतु या कराराला सोमवारीच मंजुरी देण्यात आली. कराराच्या बाजूने 124 मते पडली.