
‘एकेकाळी मराठेशाहीचे संस्थान असलेल्या मराठी बडोद्यात सगळे महापौर गुजराती होतात. मग इथे हिंदू-मराठी चर्चा कसली करताय? हा महाराष्ट्र आहे. इथल्या प्रत्येक शहराचा महापौर मराठीच होणार, मुंबईचा महापौरही मराठीच होणार,’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठणकावले.
शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी हिंदू महापौर पदाची चर्चा सुरू करणाऱयांवर तोफ डागली. आपला मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी इतिहासातील महत्त्वाचा दाखला दिला. ‘पेशव्यांच्या काळात तीन संस्थाने उभी राहिली. गायकवाड, शिंदे आणि होळकर ही ती संस्थाने होती. गुजरातमध्ये बडोद्यात जे साम्राज्य उभं राहिलं, ते मराठेशाहीचं होतं, पण त्या बडोद्यामध्ये सगळे महापौर गुजरातीच होतात,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
बंगालमध्ये बिनविरोध चालत नाही, महाराष्ट्रात कसे चालते?
सत्ताधारी उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरून राज ठाकरे यांनी भाजपला घेरले. ’पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी भारतीय जनता पक्ष सुप्रीम कोर्टात गेला होता. महाराष्ट्रातील त्याच प्रकाराबद्दल भाजपचं आता काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगावं. पश्चिम बंगालमध्ये चालत नाही, मग महाराष्ट्रात कसे चालते,’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
म्हणून वचननाम्यात ‘मुंबईकर’ असा उल्लेख
वचननाम्यात मराठी माणसाऐवजी सर्वत्र ‘मुंबईकर’ असा उल्लेख आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी सविस्तर उत्तर दिले. ‘हा वचननामा निवडणूक आयोगाला पाठवला जातो. तिथून मान्यता मिळते. सध्याच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला ‘मुंबईकर’ म्हणजे मराठी माणूसच म्हणायचे आहे. मात्र, त्या शब्दावर आक्षेप घेऊन वचननामा नाकारला जाऊ नये म्हणून आम्ही मुंबईकर हा शब्द टाकला,’ असे त्यांनी सांगितले.
विकासाची कामे कशी होणार?
मुंबई महापालिकेत शिवसेना-मनसे युतीची बहुमताची सत्ता आल्यानंतर विकासाच्या अनेक कामांना केंद्र व राज्य सरकारची मंजुरी लागेल. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ती कशी होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, ‘आमच्या चांगल्या योजनांना केंद्र व राज्यांनी विरोध करावा. त्यांना आधी नाकारू तर द्या. ते समोर येईलच ना. आमच्या योजनांना परवानगी देत नाहीत असे दिसेल तेव्हा बघू,’ असे राज ठाकरे म्हणाले.
शिवसेना भवनाच्या आठवणी आनंददायी आणि रोमांचकारक
‘खूप वर्षांनी मी आज शिवसेना भवनमध्ये आलो. नवीन शिवसेना भवन पहिल्यांदाच बघतोय. माझ्या मनात कायमच्या कोरल्या गेलेल्या आठवणी जुन्या शिवसेना भवनातल्या आहेत. त्यामुळे कुठे काय होतं हेच आता मला आठवत नाही. जुन्या शिवसेना भवनातल्या आठवणी रोमांचकारी, आनंददायी आहेत. अनेक आठवणी सांगण्यासारख्या आहेत,’ अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या. राज ठाकरे अनेक वर्षांनी शिवसेना भवनात आल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनीही आनंद व्यक्त केला. ‘संपूर्ण महाराष्ट्रात नवे चैतन्य संचारले आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सत्ता गेल्यावर दामदुपटीने वसूल होईल तेव्हा तक्रार करू नका!
‘सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेले नाही. काँग्रेसने हे केले, काँग्रेसने ते केले म्हणून आम्ही करतो असे तुम्ही सांगता, पण तुम्ही गेल्यावर दुसरे येणार आहेत. ते जेव्हा तुमच्या दामदुपटीने हेच प्रकार सुरू करतील त्यावेळी कोणाकडे तक्रार करू नका. आम्ही सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही असे भाजपला वाटत असेल तर त्यांचा हा भ्रम दूर झाला पाहिजे. उद्या सत्ता परिवर्तन झाल्यानंतर दुसरे आपल्यापेक्षा वाईट वागल्यास काय होईल, याचा विचार राज्यकर्त्यांनी करणे गरजेचे असते. आपण चुकीचे पायंडे पाडत नाही ना याचे भान ठेवले पाहिजे,’ असे राज ठाकरे म्हणाले.



























































