
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोहित पवारांनी अपघात प्रकरणातील सर्व तांत्रिक बाबी समजावून सांगितल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले होते तेच त्यांनी प्रत्यक्ष भेटीतही सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. राज ठाकरे म्हणाले की, रोहित पवारांनी तीन ठिकाणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला; मात्र तिन्ही ठिकाणी तो स्वीकारण्यात आला नाही. संबंधित पोलीस ठाण्यांना एफआयआर घेऊ नये, असे सांगितले गेले असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळेच संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
ते म्हणाले, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अधिकारी एफआयआर टाईप करत असताना तेथे डीसीपी आले आणि एफआयआर नोंदवू नये, असे सांगितले. हा प्रकार कशासाठी आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर हा निव्वळ अपघात असेल आणि घातपात नसेल, तरी संबंधित कुटुंबीयांना शंका असल्यास किंवा चौकशी व्यवस्थित व्हावी म्हणून एफआयआर करायचा असल्यास त्यात अडथळे का आणले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.
सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्या संबंधित व्यक्तीच्या पत्नी असल्याने त्यांनीही या बाबीकडे लक्ष द्यावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. सरकारकडून एफआयआर नोंदवू नका, असा दबाव येत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात कोणीही एफआयआर नोंदवू शकतो, असे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात अडथळे आणले जात असतील तर त्यामागे काहीतरी कारण आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे म्हणाले की, सरकारने याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे. एफआयआर नोंदवण्यात काय अडचण आहे, हे सांगावे. तीन ठिकाणी प्रयत्न करूनही एफआयआर नोंदवला गेला नाही आणि पोलीस ठाण्यांवर दबाव टाकला जात असेल, तर हे का घडत आहे, हे स्पष्ट व्हावे.
ब्लॅक बॉक्सबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. विमान पूर्णपणे नष्ट झाले तरी ब्लॅक बॉक्स सहसा नष्ट होत नाही, असे ते म्हणाले. त्याबाबत काय स्थिती आहे, हेही स्पष्ट व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.
हा विषय कोणत्याही राजकारणाच्या पलीकडचा असल्याचे ते म्हणाले. एका व्यक्तीचा दुर्दैवी अपघात झाला असून अशा दुर्घटना कोणाच्याही बाबतीत होऊ नयेत, असे त्यांनी नमूद केले. अपघातातील त्रुटी एफआयआरमध्ये मांडायच्या असतील तर त्या मांडू दिल्या जात नाहीत, असेही त्यांनी म्हटले.
सरकारकडून अधिकाऱ्यांना एफआयआर नोंदवू नका, असे सांगितले जात असेल तर अधिकाऱ्यांना दोष देता येणार नाही, असे ते म्हणाले. सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असल्याने हा मुद्दा अधिवेशनात मांडावा. पुढे लोकसभेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर संबंधित खासदारांनीही हा प्रश्न उपस्थित करावा, असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी सांगितले की, सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवला जात नसेल, विशेषत: अजित पवारांसारख्या व्यक्तीच्या प्रकरणात, तर नेमके काय सुरू आहे, याचे उत्तर सरकारने द्यावे. एका महिन्याचा कालावधी होत आला असून प्राथमिक अहवालही सादर झालेला नाही, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तीन ठिकाणी प्रयत्न करूनही एफआयआर नोंदवण्यास नकार दिला गेला, तर शासकीय यंत्रणेवर दबाव असल्याचा संशय निर्माण होतो, असे ते म्हणाले. या प्रकरणात मुख्यमंत्री बोललेच पाहिजेत, तसेच सुनेत्रा पवार यांनीही भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. एका एफआयआरला सरकार का घाबरत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.































































