प्रत्येक संकटाचा बोजा जनतेवरच का? पंतप्रधान मोदींच्या लोकसभेतील विधानावर अरविंद केजरीवाल यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी देशवासियांनी तयार राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केले होते. पंतप्रधानांच्या या विधानाचा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला असून, सरकारच्या अपयशाचा आणि प्रत्येक संकटाचा बोजा शेवटी सामान्य जनतेवरच का टाकला जातो, असा सवाल करत जोरदार पलटवार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना मध्यपूर्वेतील परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे नमूद केले होते. ज्याप्रमाणे देशाने कोरोना संकटाचा एकजुटीने सामना केला, त्याचप्रमाणे या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी सज्ज राहावे, असे त्यांनी म्हटले होते. मात्र या आवाहनावर अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जेव्हा जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार याची पूर्वकल्पना होती, तेव्हा मोदी सरकारने पर्यायी उपाययोजना का केल्या नाहीत?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे आज शेअर बाजार कोसळत आहे आणि रुपयाची किंमत विक्रमी स्तरावर खाली आली आहे. एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे आधीच महागाईने होरपळणारी जनता आता रांगांमध्ये उभी आहे. तर अनेक छोटे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भीषण उष्णतेच्या काळात सामान्य नागरिकांना आणि स्थलांतरित मजुरांना पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या खाईत लोटले जात असून, या सर्व गोंधळाला सरकारची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधानांचे कूटनीती आणि चर्चेचे दावे केवळ शब्दांपुरतेच मर्यादित असून प्रत्यक्षात सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे ऊर्जा संकट निर्माण होणार हे माहीत असूनही सरकारने योग्य पावले उचलली नाहीत आणि आता पुन्हा एकदा जनतेलाच त्याग करण्याचे आवाहन केले जात आहे, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले.