दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदलणं का गरजेचं आहे ?

दात घासण्यासाठीचा टूथब्रश जोपर्यंत आपल्याला कंटाळा येत नाही किंवा तो फारच वाईट स्थितीत येत नाही तोपर्यंत न बदलण्याकडे बहुसंख्य जणांचा कल असतो. दाताचे डॉक्टर त्यांच्या रुग्णांना ब्रश दर तीन महिन्यांनी बदला असा सल्ला देत असतात. मात्र असं का याचं उत्तर अनेकांना माहिती नसतं. पेशाने डेंटीस्ट असलेल्या विशाखा देशमुख यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना वाचकांना पहिले प्रश्न विचारला आहे की, ‘तुम्ही जर तोंडाची योग्य स्वच्छता ठेवत असणारे असाल म्हणजेच तुम्ही दररोज दिवसातून दोन वेळा दात घासत असणार तर तुम्ही तुमचा ब्रश कधी बदलता? ब्रश चा खराटा बनल्यावर ? का टूथपेस्टवरसोबतचा मोफत टूथब्रश घरी येत नाही तोपर्यंत ?’ या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मनापासून दिल्यानंतर आपण मूळ मुद्दाकडे वळूयात

टूथब्रश का बदलायचा ?

कोरा (quora) या प्रश्नउत्तरांच्या संकेतस्थळावर विशाखा देशमुख यांनी लिहिलेल्या उत्तरामध्ये म्हटलंय की जीर्ण झालेला टूथब्रश नविन ब्रशच्या तुलनेत कमी प्लाक (दात आणि हिरड्यांवरील एक प्रकारचा थर) काढतो. आणि जर प्लाक काढला नाही तर हिरड्यांचे आजार वाढतात. खराब झालेला टूथब्रश वापरल्याने दाताच्या समस्या वाढू शकतात व तोंडाला दुर्गंधी यायला सुरुवात होते. ब्रश जुना झाल्यानंतर त्याचे तंतू ज्यांना आपण ब्रिस्टल म्हणतो ते वेडेवाकडे होतात आणि त्यामुळे हिरड्यांना जखम होऊन रक्त येण्याची शक्यता असते.

ब्रशच देतो बदलण्याचे संकेत

काही जणांना जास्त दाब देऊन दात घासण्याची सवय असते, अशा लोकांनी ब्रश लवकर बदलावा असा सल्ला विशाखा यांनी दिला आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या टूथब्रशचे ब्रिस्टल वेगळ्या दिशेत वळलेले दिसतात तेव्हा ब्रश बदलण्याचे तुम्हाला संकेत मिळालेत असे समजावे असेही त्यांनी सांगितले आहे. जर आपण दिवसातून दोन वेळा किमान दोन – तीन मिनिटे दात घासत असू तर आपण वापरत असलेल्या ब्रशचे मऊ ब्रिस्टल्स जीर्ण व्हायला सुरुवात होते. यामुळे दात आणि हिरड्यांवरील बॅक्टरीया ज्यांना आपण साध्या भाषेत किडे म्हणतो ते अपेक्षित क्षमतेने साफ होत नाहीत

प्रत्येक वस्तु टीकण्याचा एक मर्यादित कालावधी असतो. या कालावधीनंतर ती वस्तू टाकाऊ होते कारण ती अपेक्षित परिणाम देत नाही. साधा टूथब्रश असो किंवा इलेक्ट्रॉनिक टूथब्रश त्यांचेही असेच असल्याचे देशमुख सांगतात. इलेक्ट्रॉनिक टूथब्रश व्यवस्थित काम करतो मात्र त्याचे हेडस बदलणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

बऱ्याच मंडळींचे काम हे फिरत्या स्वरुपाचे असते. अशा मंडळींचे आणि पर्यटनासाठी जाणारी बरीच मंडळी प्रवासासाठीचे डेंटल किट वेगळे बाळगतात. त्यातील ब्रश हा बाहेर गेल्यानंतरच वापरला जातो. घरातला ब्रश असो किंवा अशा डेंटल किटमधला ब्रश हे दोन्ही दर तीन महिन्यांनी बदलावे असा सल्ला विशाखा देशमुख यांनी दिला आहे.

विशाखा देशमुख (Vishakha Deshmukh) चे उत्तर वाचा लाटूथब्रश चांगला असेल तरी दर तीन महिन्यांनी बदलणे गरजेचे आहे का? Quora वर

ब्रश वापरताना घ्यायची काळजी

नेहमी दात घासण्यापूर्वी ब्रश स्वच्छ पाण्याने धुवायला हवा. या गोष्टीकडे बरेचजण दुर्लक्ष करतात

ब्रशचे काम झाल्यावर त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून अशा ठिकाणी ठेवावं जिथे हवेत किटाणू नसतील.

ब्रश हा नेहेमी अशा जागी ठेवावा जिथे त्याला मोकळी हवा मिळेल आणि तो कोरडा राहील, यामुळे ब्रशवर बॅक्टरीया तयार होणार नाहीत.

भांडी घासताना जसा जोर लावतो तसा जोर दात घासताना लावायची अजिबात गरज नसते. आपल्याला फक्त दातांवर तयार झालेला चिकट थर काढायचा आहे यासाठी मर्यादित दाब पुरेसा असतो.

सर्वांच्या टूथब्रशचे ब्रिस्टल्स एकमेकांना चिटकून ठेवलेले नसावेत. यामुळे एका ब्रशवरून बॅक्टेरिया दुसऱ्या ब्रशवर जाण्याची जास्त शक्यता असते.

व्हायरल इन्फेकशनमधून किंवा कुठलाही आजारातून बरे झाल्यानंतर शक्यतो टूथब्रश बदलावा आणि आजारपणात शक्यतो आपला ब्रश इतरांपेक्षा वेगळ्या ठिकाणी ठेवावा.

दात घासल्यावर लगेच ओला टूथब्रश बंद डब्यात ठेऊ नये.

टॉयलेट च्या जवळ टूथब्रश ठेवत असाल तर त्या टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया तुमच्या ब्रशवर मिळतील.

आपली प्रतिक्रिया द्या