
कसोटी आणि टी-20 मालिका गमावलेल्या वेस्ट इंडीजने एकदिवसीय क्रिकेट मालिकेत झकास सुरुवात करताना यजमान हिंदुस्थानला पहिल्या लढतीत 13 चेंडू व 8 गडी राखून हरवले. शिमरॉन हेटमायर (139) व आघाडीवीर शाई होप (नाबाद 102) यांनी झुंजार शतके ठोकून हिंदुस्थानी गोलंदाजी निष्प्रभ ठरवली. विजयी सलामीसह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. शतकवीर हेटमायर या सामन्याचा मानकरी ठरला.
हिंदुस्थानकडून मिळालेले 288 धावांचे लक्ष्य विंडीजने 47.5 षटकांत 2 बाद 291 धावा करीत पूर्ण केले. दीपक चहरने पाचव्या षटकांत सुनील अम्रीसला (9) पायचित पकडले. एवढी एक घटना सोडली तर हिंदुस्थानच्या बाजूने काहीच घडले नाही. सलामीवीर शाई होपने एका बाजूने संयमाने फलंदाजी केली, तर शिमरॉन हेटमायरने वादळी शतक ठोकून हिंदुस्थानी गोलंदाजीच्या ठिकर्या उडवल्या. हेटमायरने 139 धावांच्या खेळीत 106 चेंडूंना सामोरे जाताना 11 सणसणीत चौकारांसह 7 षटकारांचा घणाघात केला. मोहम्मद शमीने श्रेयर अय्यरकरवी झेलबाद करून हेडमायरचे वादळ थांबवले. मात्र होपने आलेल्या निकोलस पूरनच्या (नाबाद 29) साथीने विजयाला गवसणी घातली. होपने 151 चेंडूंच्या संयमी खेळीत 1 षटकार व 7 चौकारांसह नाबाद 102 धावांची खेळी सजवली. पूरनने पदार्पणवीर शिवम दुबेला लागोपाठ चौकार ठोकून सामना संपवला.
कॉट्टरेलचा डबल धमाका
त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हिंदुस्थानची अडखळती सुरुवात झाली. टी-20 मालिकेत लक्षवेधी कामगिरी करणारा सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली अपयशी ठरले. शेल्डॉन कॉट्टरेलने सातव्या षटकात डबल धमाका केला. त्याने दुसर्या चेंडूवर राहुल (6) हेटमायरकरवी झेलबाद करून विंडीजला सनसनाटी सुरुवात करून दिली. मग अखेरच्या चेंडूवर आलेल्या विराटचा त्रिफळा उडवून हिंदुस्थानला जबर धक्का दिला.
अय्यर-पंत यांची शतकी भागीदारी
महत्त्वाचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर दुसरा आघाडीवीर रोहित शर्मावरही दडपण आले. त्यामुळे त्याने आपल्या नैसर्गिक आक्रमकतेला थोडी मुरड घालून 56 चेंडूंत 6 चौकारांसह 36 धावांची खेळी केली. अल्झारी जोसेफने त्याला पोलार्डकरवी झेलबाद करून हिंदुस्थानची 3 बाद 80 अशी स्थिती केली, मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर (70) व रिषभ पंत (71) यांनी झुंजार अर्धशतके झळकावत हिंदुस्थानचा डाव सावरला. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली.

























































