विधवा महिलेलाही पोटगीचा हक्क; सासऱ्याकडूनही देखभालीचा खर्च मागता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधवा महिलेलाही पोटगीचा हक्क असून ती सासऱ्याकडून देखभालीचा खर्च मागू शकते, असा महत्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. पतीचा मृत्यू झाला तरी पत्नीला पोटगी देण्याचे त्याचे कायदेशीर कर्तव्य संपत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पतीच्या मालमत्तेतून उदरनिर्वाह शक्य नसल्यास विधवा महिला सासऱ्याकडून देखभाल खर्च मागू शकते असे न्यायालयाने नमूद केले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अकुल रस्तोगी नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीवर खोटे बोलल्याचा आरोप करत तिच्यावर खटला चालवण्याची मागणी केली होती. पत्नीने गृहिणी असल्याचे खोटे सांगितले. प्रत्यक्षात ती नोकरी करत असून तिच्याकडे लाखो रुपयांच्या ठेवी आहेत असा दावा करत रामपूर कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

या प्रकरणावर न्यायमूर्ती अरिंदम सिन्हा आणि न्यायमूर्ती सत्य वीर सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने पतीचे हे सर्व दावे फेटाळून लावले. एखादी माहिती लपवणे म्हणजे खोटी साक्ष देणे असा होत नाही. पत्नीच्या नावे असलेल्या मुदत ठेवी तिच्या वडिलांनी केल्या होत्या. लग्नानंतर मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी पतीची असते, असे खडेबोल न्यायालयाने पतीला सुनावले. पत्नीकडे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने तिला पतीकडून आर्थिक मदतीची गरज आहे. हिंदू कायद्यानुसार पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला सांभाळण्याचे त्याचे कर्तव्य संपत नाही. पतीच्या निधनानंतर त्याच्या मालमत्तेतून पत्नीला पुरेसा खर्च मिळत नसेल, तर विशिष्ट परिस्थितीत ती आपल्या सासऱ्यांकडे पोटगीची मागणी करू शकते, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निकाल कायम ठेवत पत्नीला पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले.