पत्नीने हनीट्रॅप लावून पतीचा काटा काढला; प्रियकराच्या मदतीने रचला हत्येचा कट, नागोठणे पोलिसांनी 72 तासांत केला उलगडा

प्रियकरासोबत लग्न करण्याच्या हव्यासापोटी पत्नीने पतीला हनीट्रॅपमध्ये अडकवून प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून तिने प्रियकर व त्याच्या मैत्रिणीच्या मदतीने पती कृष्णा खंडवी कृष्णाचा शोध पोलिसांनी सुरू केला आणि हा हत्याकांड उघडकीस आला. कोणतेही पुरावे नसताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांनी ७२ तासांत हत्येचा उलगडा करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

पेणच्या पाबळ येथील गौळावाडीतील कृष्णा खंडवी याचे दीपाली निरगुडेसोबत लग्न झाले होते. मात्र दीपाली ही दोन वर्षांपासून नर्सिंगचा कोर्स करण्यासाठी माणगाव येथे वेगळी राहत होती. दरम्यान तिचे नाशिकच्या उमेश महाकाळसोबत प्रेमसंबंध जुळले. मात्र त्या दोघांमध्ये कृष्णा आड येत असल्याने दीपाली आणि उमेशने त्याच्या हत्येचा कट रचला. उमेशने त्याची मैत्रीण सुप्रिया चौधरी हिच्या मदतीने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केले. त्या अकाऊंटवरून सुप्रियाने कृष्णाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तुला भेटायचे आहे असे सांगून नागोठण्याच्या एसटी स्टॅण्डवर बोलावले.

पुरावा नष्ट केला
नागोठणे एसटी स्टॅण्डवर उमेश आणि सुप्रिया या दोघांनी कृष्णाला बाईकवर बसवले आणि ट्रिपल सीट वासगावच्या जंगलात घेऊन गेले. त्यांची ओळख पटू नये यासाठी त्यांनी तोंडाला रुमाल आणि स्कार्फ बांधला होता. निर्जनस्थळी पोहोचल्यानंतर उमेशने कृष्णाचा ओढणीने गळा आवळला आणि जमिनीवर आपटून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी कृष्णाच्या चेहरा, हात आणि छातीवर केमिकल टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज पाटील, महेश लांगी, प्रशांत भोईर तसेच अन्य टीमने शिताफीने तपास करत हत्याकांडाचा पर्दाफाश केला.