अजबगजब! डोक्यावरच्या केसांवर दरोडा घालणारे सहा चोर गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शीर्षक वाचून नक्कीच गोंधळात पडला असाल. डोक्यावरच्या केसांवर दरोडा? कसं शक्य आहे? असे प्रश्नही तुम्हाला पडले असतील. पण, दिल्लीत बंदुकीच्या धाकावर डोक्यावरचे केस पळवणाऱ्या चोरांना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली येथील केसांचे विग बनवून विकणाऱ्या दुकानात दरोडा घालणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे. या चोरांनी सुमारे २५ लाख रुपयांचे केसांचे विग लुटले होते. हे विग लुटून त्यांना केसांच्या विगचं दुकान थाटायचं होतं. या टोळीतले मुख्य दोन चोर मंगलसेन आणि अजय कुमार हे दोघेही या लुटीचे मास्टरमाईंड होते. या दोघांना कुणीतरी मानवी केसांच्या व्यापारात प्रचंड फायदा असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे या दोघांनाही हा व्यवसाय करायचा होता. मात्र, यासाठी त्यांच्याकडे पुरेसं भांडवल नसल्याने त्यांनी लुटीचा मार्ग स्वीकारला.

२७ जुलै रोजी मंगलसेन आणि अजने विग व्यावसायिकाकडील २५ लाखांचे विग बंदुकीच्या धाकावर लुटले. हे केस तिरुपती बालाजी संस्थान आणि अन्य काही ठिकाणांहून मागवलेल्या केसांपासून बनवले होते. व्यावसायिकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या दोघांसह अन्य चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून २५ लाखांचे विग आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे.