भाजपला सत्तेतून उखडून फेकल्यानंतरच दिल्लीत पाऊल ठेवणार, ममता बॅनर्जी यांची गर्जना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराचा धडाका वाढला असून, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप नेतृत्वावर बोचरी टीका केली आहे. “भाजपला सत्तेतून उखडून फेकल्यानंतरच मी दिल्लीत पाऊल ठेवीन,” असे थेट आव्हान त्यांनी आसनसोल येथील सभेत दिले.

आसनसोल उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मलय घटक आणि तापस बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “तुम्ही दिल्लीचा लाडू खाल्लात तर तुम्हाला पश्चात्ताप होईल. आम्ही इथे लाडू बनवत नाही, आम्ही नारू (नारळापासून बनवलेली एक गोल बंगाली मिठाई) बनवतो. एकदा का आपण जिंकलो की, मी बंगालहून थेट दिल्लीला नारूची माठ पाठवीन.”

केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापरावरून त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचा मोटा भाई असा उल्लेख करत टोला लगावला. “बघा मोटा भाई आले, आपल्यासोबत ईडी आणि सीबीआयला घेऊनच,” अशी टीका त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, हिंमत असेल तर समोरासमोर लढा, लोकशाही मार्गाने याचा बदला घेतला जाईल.

ममता बॅनर्जी यांनी मतदार यादीतून नावे कापली जात असल्याचा गंभीर आरोप केला. “३२ लाख नावे परत जोडण्यासाठी मी संघर्ष केला असून अजून ९० लाख नावे जोडणे बाकी आहे, ज्यात ६० लाख हिंदू आणि ३० लाख मुसलमान आहेत,” असे त्या म्हणाल्या. तसेच बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत एनआरसी (NRC) लागू होऊ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत.