कर्नाक पूल खुला होण्यास आणखी 8 दिवस लागणार, पुलावरील महत्त्वाच्या रंगकामात पावसाचा अडथळा

अडीच वर्षांच्या पुनर्बांधणीनंतर बांधून पूर्ण झालेला कर्नाक पुलाच्या आजचा लोकार्पणाचा मुहूर्त चुकला असून हा पूल खुला होण्यासाठी आणखी 8 दिवस लागणार आहेत. पुलावरील महत्त्वाच्या रंगकामात पावसाचा अडथळा असून उन्ह पडल्यानंतर ही कामे तातडीने करत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली.

दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरासाठी महत्त्वाचा असलेला कर्नाक पूल तब्बल अडीच वर्षांच्या पुनर्बांधणीनंतर पूर्ण झाला आहे. मात्र, पुलावरील गर्डर, लेन, रोड तसेच इतर कामे करण्यात पावसाचा अडथळा आहे. ही कामे पूर्ण केल्यानंतरच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. 154 वर्षें जुना पूल धोकादायक झाल्यामुळे 19 नोव्हेंबर 2022 तोडण्यात आला होता.

15 जूनला भार चाचणी 

पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे जसे की, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, पथदिवे, थर्मोप्लास्ट, पॅट आईज इत्यादी कामे 14 जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. पुलाची भारक्षमता, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी 13 जूनला भार चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचे परिणाम 48 तासानंतर म्हणजेच 15 जूनला प्राप्त होणे अपेक्षित आहे.

कर्नाक पूल बांधून पूर्ण झाला आहे. मात्र, पावसामुळे वाहतुकीसाठी  आवश्यक असेलल्या मार्ग रेषा आखणी, पथदिवे, रंगरंगोटी, गर्डर, लाद्या, दिशादर्शक फलक उभारणीची कामे करता आली नाहीत. या सर्वांसाठी कडकडीत उन्ह आवश्यक असते. रंग मारून तो सुकणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियेसाठी किमान 4 ते 8 दिवस लागतील. पाऊस पडला नाही तर ही कामे होतील. त्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

उत्तम श्रोते, रस्ते-पूल मुख्य अभियंता, महापालिका