विंग कमांडर अभिनंदन यांना वीरचक्र, शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना सेना मेडल

77
wing-commander-abhinandan-v

ऑपरेशन बालाकोटनंतर पाकिस्तानी सैन्याने हिंदुस्थानवर हल्ला करण्यासाठी पाठविलेल्या एफ-16 लढाऊ विमानाच्या हवेतच चिंधडय़ा उडविणारे बहाद्दूर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ऑपरेशन बालाकोट फत्ते करणाऱया हवाई दलाच्या पाच पायलटना वायुसेना मेडल देण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेना मेडल प्रदान करण्यात येणार आहे. तसेच शहीद जवान प्रकाश जाधव यांच्या शौर्याचा गौरव कीर्तिचक्र देऊन केला जाणार आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्कर, हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलाच्या 132 जणांना शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये दोन कीर्तिचक्र, एक वीरचक्र, 14 शौर्यचक्र यांचा समावेश आहे.

– पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन बालाकोट फत्ते केले. हे ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण करणारे पायलट विंग कमांडर अमित रंजन, स्क्वार्डन लीडर राहुल बासोय, स्क्वार्डन लीडर पंकज अरविंद भुजादे, स्क्वार्डन लीडर बी. कार्तिक नारायण रेड्डी, स्क्वार्डर लीडर शशांक सिंह यांना वायुसेना मेडलने गौरविण्यात येणार आहे. हे ऑपरेशन फत्ते करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया प्लाइट कंट्रोलर मिंटी अग्रवाल यांना युद्धसेवा मेडल जाहीर झाले आहे. त्याचबरोबर एअर कमोडॉर सुनील काशिनाथ विधाते यांनाही युद्धसेवा मेडल प्रदान करण्यात येणार आहे.
बालाकोट येथील जैश-ए-मोहंमदचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकडे बिथरले, पाकिस्तानी सैन्याने एफ-16 विमानाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी हवेतच एफ-16च्या चिंधडय़ा उडविल्या. विंग कमांडर अभिनंदन यांच्या अतुलनीय शौर्याचा वीरचक्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

शहीद प्रकाश जाधव यांना कीर्तिचक्र
शहीद प्रकाश जाधव यांच्या अतुलनीय शौर्याचा कीर्तिचक्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट हर्षपालसिंग यांनाही कीर्तिचक्र प्रदान करण्यात येईल. 14 शूर जवानांना शौर्यचक्र प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये शहीद मेजर विभूती शंकर डोनियाल यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात येणार आहे. लष्कराचे कॅप्टन महेशकुमार भुरे, सीआरपीएफचे ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्यचक्र प्रदान केले जाणार आहे.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना सेना मेडल
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेना मेडल प्रदान केले जाणार आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-कश्मिरात गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. बहाद्दूर मेजर राणे यांनी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखली. मूळचे सिंधुदुर्ग जिह्यातील शहीद मेजर राणे यांचे कुटुंब मीरा रोड येथे राहायला आहे. त्यांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव सेना मेडल देऊन केला जाणार आहे.