
दुबई येथे एअर शोमध्ये 21 नोव्हेंबर रोजी ‘तेजस’ लढाऊ विमान कोसळल्यामुळे वीरमरण प्राप्त झालेले विंग कमांडर नमांश स्याल यांना संपूर्ण देशाने साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिह्यातील पटियालकर या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा चुलत भाऊ निशांत यांनी मुखाग्नी दिला. दिवंगत पती नमांश यांना अखेरचा सॅल्यूट करताना पत्नी अफशान अख्तर यांना अश्रू अनावर झाले.
एअर शोमध्ये कवायती सादर करण्यासाठी नमांश हे तेजस विमानाला आकाशात घेऊन झेपावले, मात्र निगेटिव्ह-जी प्रकारची कवायत सादर करताना विमान अनियंत्रित झाले आणि त्यात नमांश यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव रविवारी मूळ गावी नेण्यात आले. नमांश यांचे पार्थिव पाहून नमांश यांच्या आईने हंबरडा फोडला. नमांश यांची पत्नी अफशान हीदेखील वायुदलात कार्यरत आहे. तिने वायुसेनेच्या गणवेशात नमांश यांना अखेरचा सॅल्यूट केला. नमांश यांच्या कुटुंबीयांना वायुदलातील त्यांच्या सहकाऱ्यांनी धीर दिला.
अपघातानंतर शो थांबविला नाही, अमेरिकन वैमानिकाची टीका
तेजस विमान कोसळून त्यात विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाल्यानंतरही एअर शो सुरू ठेवल्याबद्दल अमेरिकेतील एरोबॅटिक वैमानिक टेलर हिस्टर यांनी आयोजकांवर टीका केली आहे. हा प्रकार धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. हिस्टर आणि त्यांची टीम एअर शोमध्ये कवायती सादर करणार होती, मात्र अपघातानंतर त्यांनी माघार घेतली, तर रशियाच्या टीमने आकाशात विशेष फॉर्मेशनद्वारे नमांश स्याल यांच्या प्रति सद्भावना व्यक्त केली होती.



























































