
बदलत्या ऋतूचक्रामुळे डिसेंबर महिना उजाडला तरी मुंबईत थंडी दाखल झालेली नाही. यंदा पावसाने हवामान खात्यासह सर्वांच्याच अंदाजावर पाणी फेरले होते. त्याप्रमाणेच आता थंडीने आपला रंग बदलत हुलकावणी दिली आहे. आठवडाभर पहाटेच्या वातावरणात उकाडा कायम राहिला आहे. त्यामुळे थंडी नेमकी गेली कुठे, असा प्रश्न मुंबईकरांच्या तोंडून बाहेर पडत आहे.
यंदा पाऊस अनपेक्षितपणे दीर्घकाळ मुक्कामी राहिला होता. पावसाच्या जोरदार हजेरीमुळे थंडीचाही कडाका वाढेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र थंडीने हे अंदाज खोटे ठरवत मुंबईकरांना वाट पाहायला लावली आहे. डिसेंबर महिना उजाडला तरी शहर व उपनगरातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. डिसेंबरच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत पहाटेचे तापमान हे 23 अंशांच्याच आसपास राहिले. मंगळवारच्या तापमानात चार अंशांची वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईकरांनी घरातील पंख्यांना अजून विश्रांती दिलेली नाही.
मुंबईकडे नैऋत्य दिशेकडून येणारे वारे वाहत आहेत. तसेच हवेतील आर्दतेचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे थंडीचे आगमन लांबले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत हवेतील गारवा वाढेल. – नीता शशीधरन, हवामान विभाग अधिकारी

























































