… म्हणून देवेंद्र फडणवीस सभागृहात गोंधळ घालताहेत, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा पराभव झाला हे मान्य नाही. फडणवीस हे अद्याप पराभव पचवू शकलेले नाहीत त्याचमुळे त्यांनी सभागृहात गोंधळ घातला. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने वागले त्यावरुन त्यांना सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणायचा होता हा त्यांचा हेतू स्पष्ट आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा महापूर आला, दुष्काळ आला होता. किती नुकसान झाले, काय काय घडलं ते तुम्हाला माहित आहे. केंद्र सरकारला याबाबत तुम्ही पत्रही लिहिलं होतं. परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसानही तुम्हाला ठाऊक आहे. जर राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर आपण (सत्ताधारी आणि विरोधक) केंद्राकडे जाऊया आणि मदत मागू अशी त्यांची भूमिका असायला हवी होती, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा पराभव मान्य नाही त्यामुळे ते गोंधळ घालण्याची भूमिका घेत आहेत असाही आरोप चव्हाण यांनी केला. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी विरोधकांनी सत्ताधाऱ्याची साथ दिली पाहिजे. मात्र आज जे काही घडले ते अत्यंत अप्रिय आहे, असेही चव्हाण म्हणाले.

कालाय तस्मै नम:, ‘सामना’चे बॅनर झळकवणाऱ्या भाजपला मुख्यमंत्र्यांचा टोला

आत्तापर्यंत विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या आसनासमोर कुणीही फलक दाखवत नाही, घोषणा करत नाही. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी ते केले ही बाब निंदनीय आहे, असेही चव्हाण म्हणाले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना चव्हाण यांनी ही टिका केली आहे.