30 हजार पगार अन् 40 लाखांचे कर्ज, जेन्झी पिढी अडकतेय कर्जाच्या कचाट्यात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजच्या काळात युवा पिढी म्हणजे जेन्झी कमाई तर चांगली करतेय, पण त्याचबरोबर त्यांचा खर्चही वेगाने वाढत चाललाय. सिबील आणि युनिफाईड फिनटेक फोरम यांच्या एका रिपोर्टमधून याबाबतची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या रिपोर्टनुसार जर कोणी जेन्झी 30 हजार रुपये महिना पगार घेत असेल तर त्याच्यावर 40 लाखांचे कर्ज आहे. बंगळुरू, दिल्ली, मुंबई यांसारख्या मोठय़ा शहरांत हा ट्रेंड दिसून येतोय. युवा पिढी चांगल्या कमाईसोबतच कर्जाच्या विळख्यात अडकत चालली आहे, असे अहवालात स्पष्ट म्हटले आहे.

 सिबील आणि युनिफाईड फिनटेक फोरमच्या रिपोर्टमध्ये असे म्हटलंय की, कोणत्याही गॅरेंटीशिवाय किंवा किचकट प्रक्रियेशिवाय पर्सनल आणि इन्स्टंट लोन सहज मिळत आहे. फिनटेक ऍप, नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्या, क्रेडिट कार्ड जारी करणाऱया कंपन्या आणि बँकांकडून घेतले जाते. कर्ज सहज मिळत असल्याने ते सहजपणे काढले जातेय.

महिन्याला 25 ते 35 वर्षे वयोगटातील शेकडो तरुण गंभीर आर्थिक संकटातून वाचण्यासाठी डेट रिझोल्युशन फर्ममध्ये नोंदणी करत आहेत. 1997 ते 2000 दरम्यान जन्मलेली ही पिढी  मोठय़ा प्रमाणात कर्ज उचलत आहे. हे मागच्या पिढीपेक्षा अगदी वेगळे आहे. मागच्या पिढीचे लोक कर्ज काढायला घाबरायचे. जेन्झी युवक कर्जाच्या विळख्यात अडकल्याने त्यांचा उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ आवाक्याबाहेर गेला आहे. त्यांच्या कर्जाची सुरुवात आवश्यक वस्तू, जीवनमान उंचावणाऱया बाबी, गॅझेट्स, ट्रव्हेल यांच्यापासून किंवा करीअरसाठी काढलेल्या छोटय़ा कर्जाने होते. ईएमआय वेळेत न भरल्याने ते आणखी कर्जात अडकू लागल्याचे रिपोर्टवरून दिसून आलंय.