महिला कुस्तीपटूंची जंगलात ऑलिम्पिकची तयारी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळातून हिंदुस्थानला पदकांची आशा आहे त्यात कुस्तीचाही समावेश आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या चार महिला मल्ल कौशल्य पणाला लावणार आहेत. या कुस्तीपटू सध्या पोलंडची राजधानी वारसोपासून शंभर किलोमीटर दूर जंगलात सराव करीत आहेत. चोहोबाजूने घनदाट जंगलाने वेढलेल्या जंगलात हिंदुस्थानी कुस्तीपटू 27 जूनपर्यंत सराव करणार आहेत.

हिंदुस्थानच्या महिला कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक कुलदीप मलीक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, जंगलातील सराव संपल्यानंतर महिला कुस्तीपटू एस्टोनियाला रवाना होतील. तेथे 10 जुलैपर्यंत आमचे प्रशिक्षण शिबीर होईल. मागील ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या तीन कुस्तीपटू सहभागी झाल्या होत्या. त्या वेळी साक्षी मलीकने कास्य पदकाची कमाई करीत इतिहास घडवला. या वेळी पदकांची संख्या वाढेल, असेही ते म्हणाले.

सर्व कुस्तीपटू पदकाच्या दावेदार

रिओ ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकणारी साक्षी मलीक टोकियो ऑलिम्पिकमध्ये नाहीये. विनेश फोगाटला गुडघ्याला दुखापत झाल्याने मागच्या वेळी ऑलिम्पिकमधून बाहेर व्हावे लागले होते. मात्र या वेळच्या ऑलिम्पिकमध्ये विनेश पह्गाटसह सोनम, अंशू मलिक व सीमा बिस्ला या सर्व पदकांच्या दावेदार आहेत. सरावाबरोबर स्टॅमिना व टेक्निक यावर अधिक भर दिला जात आहे. 53 किलो गटातील विनेश फोगाटकडून सर्वाधिक पदकांची अपेक्षा आहे. याचबरोबर अंशू मलीक 57 किलो गटात, सोनम मलीक 62 किलो गटात, तर सीमा बिस्ला 50 किलो गटात पदक जिंकण्यासाठी जिवाचे रान करतील, असा विश्वासही कुलदीप मलीक यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या