
बोरघाटात झालेल्या वाहतूककोंडीमुळे एका महिलेचा बळी गेल्याची घटना रविवारी रात्री घडली. तीव्र वळणावर नियंत्रण सुटलेल्या भरधाव कारने मिनी बसला धडक दिली. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यादरम्यान वाहतूककोंडीत अडकलेल्या महिलेला हृदयविकाराचा झटका आला. तिला वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले. संध्या कांबळे असे मृत महिलेचे नाव आहे.
महाबळेश्वरहून कल्याणकडे जाणाऱ्या मिनी बसचा टायर बोरघाटात अचानक पंक्चर झाला. बसचालक टायर बदलण्याचे काम करत होता. याचवेळी ठाकूरवाडी येथील तीव्र वळणावर कारचालकाचे नियंत्रण सुटले. कार मिनी बसवर जाऊन आदळली आणि पलटी झाली. ही धडक इतकी भयंकर होती की बसमधील ३ प्रवासी तर कारमधील पाचजण जखमी झाले.
अपघातग्रस्त कार रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. याचदरम्यान वाहतूककोंडीत अडकलेल्या संध्या कांबळे यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यांच्या कुटुंबीयांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याची विनंती केली. मात्र बसमधील महिलांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यास विरोध केला. मात्र या सर्व गोंधळात अर्धा तास निघून गेला. ती महिला गाडीतच तडफडत होती. कारचालकाने वाहतूककोंडीतून कशीबशी सुटका केली. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच संध्या यांनी गाडीतच जीव सोडला.































































