
दोन्ही पायांनी अधू असलेल्या आणि घरात एकटीच असल्याची संधी साधत अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून 40 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा बाळासाहेब शिंदे (वय 40, रा. भारत बेकरी रोड, कौस्तुभ कॉलनी, बोल्हेगाव, अहिल्यानगर) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पती बाळासाहेब साहेबराव शिंदे (वय 46) यांनी फिर्याद दिली आहे.
बाळासाहेब शिंदे हे पत्नी मनीषा व मुलगा अनिकेत यांच्यासमवेत बोल्हेगावच्या कौस्तुभ कॉलनीत राहतात. मनीषा या गृहिणी असून, दोन्ही पायांनी अधू असल्याने घरातच असतात. शुक्रवारी (दि. 12) बाळासाहेब शिंदे हे मुलासह विंचूर (ता. निफाडा, जि. नाशिक) येथे गेले होते. सायंकाळी दोघेही मानोरी (ता. येवला) येथे गेले होते. तेथून त्यांनी पत्नी मनीषा यांना फोन केला. मात्र, तिने फोन उचलला नाही. त्यानंतर शिंदे यांनी शेजारी राहणारे विवेक जपे यांना फोन घेऊन घरी जाण्याची विनंती केली. जपे यांच्या पत्नीला शिंदेंच्या घरी गेल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली. मनीषा शिंदे या हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी शिंदे यांना फोन करून याबाबत माहिती दिली. मध्यरात्री शिंदे बोल्हेगाव येथे पोहोचले. त्यानंतर आज (दि. 13) पहाटे त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकऱयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
























































