ठाण्यात लाडक्या बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे, कोर्टाच्या आवारातच कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार

ठाण्यात फॅमिली कोर्टाच्या आवारातच कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला डोंबिवलीची असून तिला केकमध्ये गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध होताच कारमधून ठाण्यात आणून तिच्यावर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. हिरालाल केदार व रवी पवार अशी आरोपींची नावे असून यातील हिरालालच्या ठाणे नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहात असलेल्या ठाण्यातच लाडक्या बहिणी असुरक्षित असून त्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे

पीडित महिला ही डोंबिवली येथे कामाला आहे. 25 ऑगस्ट रोजी ती कामावर असताना रवी पवार याने तिला फोन केला. त्याने त्याचा वाढदिवस असल्याचे सांगत तिला भेटण्यासाठी बोलावले. यावेळी रवीने त्याचा साथीदार हिरालाल केदारच्या मदतीने केकमध्ये गुंगीचे औषध मिसळून आणलेला केक पीडितेला भरवला. केक खाल्ल्यानंतर तिला गुंगी आली. त्यानंतर या दोघांनी तिला कारमधून कुटुंब न्यायालयाजवळ आणले. तेथे कोर्ट परिसरातील पार्ंकग झोनमध्ये कार उभी करून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. हा प्रकार कुणालाही सांगितला तर बदनामी करण्याची धमकी आरोपींनी तिला दिली होती.

ब्लॅकमेलिंगला कंटाळून पोलिसांत धाव

गेल्या तीन महिन्यांपासून नराधम तिला वारंवार ब्लॅकमेलिंग करत होते. त्यांच्या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेत 5 डिसेंबर रोजी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी हिरालाल याला जेरबंद केले असून त्याचा साथीदार रवी पवार हा अद्याप फरार आहे.